प्रकाश शंकरराव वाजे
‘देशदूत’ परिवाराचे अध्वर्यू आणि अनेक सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ वैकुंठवासी देवकिसनजी सारडा ऊर्फ मोठे भाऊ यांची शनिवारी (दि. २०) प्रथम पुण्यतिथी. यानिमित्त त्यांचा अलौकिक जीवनप्रवास जवळून अनुभवलेल्या त्यांच्या सुहृदाने केलेले हे स्मरण.
वै. देवकिसनजी सारडा तथा आमचे काका यांचे मन कायमच सिन्नरमध्ये रमायचे. बालपणीच्या आठवणी, व्यवसायात पदार्पण केल्यानंतरचे दिवस, सामाजिक क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभ्या केलेल्या व टिकवून ठेवलेल्या संस्था यावर ते तासन्तास बोलत. सिन्नरसह देशभरात घडणार्या अनुचित घटनांनी त्यांचे मन उद्विग्न व्हायचे आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत व्हॉटस्अॅप मेसेजच्या माध्यमातून यायची. मग आमच्यातला संवाद फुलत जायचा. माझ्या आयुष्यात अनेक टप्प्यांवर त्यांनी दिलेला सल्ला मला मार्गदर्शक ठरला आहे. मात्र, कालगतीनुसार अनेक वर्षांची ही सवय वर्षभरापूर्वी खंडित झाली.
सिन्नर म्हणजे विडी उद्योगाचे माहेरघर. सारडा, चांडक, भिकुसा, वाजे, चोथवे यांच्यासह अनेक कुटुंबे या व्यवसायात होती. पण व्यवसायातील स्पर्धा कौटुंबिक संबंधांसाठी कधीही अडथळा ठरली नाही. या सर्व परिवारांचे कौटुंबिक संबंध खूपच सौहार्दाचे आणि प्रेमाचे होते. एकमेकांच्या सुखदुःखाबरोबरच दैनंदिन जीवनातही सर्व मिळून-मिसळून राहिले. काकांचे आणि माझे वैयक्तिक संबंध तसे बालपणापासूनचे आणि ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिले. त्यांचे लहान भाऊ किसनलाल सारडा हे माझे बालमित्र. आम्ही तेव्हा नाशिक वेशीतील गवळी कुटुंबाच्या माडीवर राहायचो. मागच्याच गल्लीत सारडा कुटुंबाचे निवासस्थान. किसनलालजी आणि मी सोनार देवी मंदिराजवळ राहणार्या कोरडे गुरुजींकडे शिकवणीला जात असू. त्यावेळी बस्तीरामजी सारडा घराखाली असणार्या त्यांच्या कार्यालयात गादीवर बसलेले असायचे. त्याच काळात देवकिसनजी यांच्याशी माझ्या संबंध आला. धोतर आणि डोयावर टोपी या अस्सल व्यापारी पेहरावातील काकांची छबी आजही मनात घर करून आहे.
काकांचे शिक्षण त्यावेळच्या सिन्नर नगरपालिकेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. ही शाळा नगरपालिकेने नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला चालवण्यास दिल्यानंतर सारडा परिवाराने शाळा इमारतीच्या बांधकामासाठी उदार हस्ते देणगी देत प्रशस्त दगडी इमारत बांधून दिली. त्यामागील मूळ कल्पना वै. काकांचीच होती. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेत सिन्नरच्या पुढच्या पिढीला शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांंचा हा अट्टाहास होता. सारडा परिवाराने दिलेल्या देणगीमुळे शाळेची इमारत उभी राहिल्याची जाणीव ठेवत संस्थेने शेठ बस्तीरामजी नारायणदासजी सारडा यांच्या निधनानंतर शाळेला त्यांचे नाव दिले. तालुयाच्या शैक्षणिक क्षेत्रात आजही ही शाळा पाय घट्ट रोवून उभी आहे. केवळ अध्यापनच नव्हे, तर इतर सामाजिक उपक्रमातही शाळा आघाडीवर असते. कालच या शाळेत वै. बस्तीरामजी सारडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले.
सर्वसामान्य सिन्नरकर व त्यांच्या मित्रांमध्ये बाबूशेठ या नावाने परिचित असलेले काका उंट विडीचा कारभार बघत. त्यावेळी उंट विडीचे शहरासह तालुयाच्या ग्रामीण भागात आणि राज्यातही कारखाने होते. त्यातून मोठी रोजगारनिर्मिती झाली. महाराष्ट्र विडी उद्योग संघाचे अध्यक्षपद काकांनी आपल्या कर्तबगारीने खेचून आणले. पुढे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचेही ते अध्यक्ष बनले.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षपद काकांनी अनेक वर्षे भूषवले. सिन्नरची व्यापारी पेठ आज नावलौकिक कमावून असली तरी व्यापारी बांधवांना गरजेच्या वेळी अर्थपुरवठ्यासाठी राष्ट्रीयकृत बँका सोडून अन्य पर्याय नव्हता. याचा विचार करून काकांनी गणेश पेठेतील सर्व व्यापार्यांना विश्वासात घेत सिन्नर व्यापारी सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवली. एवढेच नव्हे तर गणेश पेठेतील स्वतःची जागा बँकेसाठी दिली. बँकेचे मुख्य प्रवर्तक असणारे काका सुरुवातीची अनेक वर्षे बँकेचे इतिवृत्त स्वतः लक्ष घालून लिहायचे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही ते तीन वर्षे संचालक होते. विविध क्षेत्रात लिलया मुशाफिरी करणार्या बाबूशेठ यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. त्यांचे स्वतःचे समृद्ध असे ग्रंथालय होते. संत साहित्याचा दांडगा अभ्यास होता. ज्ञानेश्वरीवर तर अत्यंत प्रेम. त्यातलेच संदर्भ ते भाषणातून देत. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर यांच्यासह अनेक संत महात्म्यांचे विचार सिन्नरकरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे हरिनाम सप्ताहाचे सिन्नरमध्ये आयोजन केले. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या पटांगणात होणार्या या सप्ताहांना सिन्नरकर मोठी गर्दी करत.
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने सिन्नरला महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्व. भगवंतराव वाजे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी माई वाजे व जावई निराकांत पवार यांनी आपली १४ एकर शेतजमीन संस्थेला दान केली. त्यावर महाविद्यालयाची इमारत उभी राहिली. तेथे कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू झाले. या कॉलेजला स्व. भगवंतराव वाजे यांचे नाव देण्यात आले. पुढे काकांनी आपल्या विडी कारखान्यांमधील कामगारांनी रुप-रुपया जमवून दिलेल्या निधीत तेवढेच पैसे टाकून ५१ हजारांची देणगी महाविद्यालयाला दिली. काकांची गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. त्यांचे कार्य सिन्नरकरांसमोर नेहमी राहावे यासाठी त्यांनी सिन्नर महाविद्यालयाला गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे नाव देण्याची विनंती केली आणि संस्थेनेही ती मान्य केली.
सन १९६७ नंतर काका कुटुंबियांसह नाशिकला राहायला गेले. त्यानंतर त्यांचा सिन्नरशी संपर्क काहीसा कमी झाला तरी सिन्नरकरांच्या सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होत. कुठलाही प्रसंग घडला की सिन्नरला हजर होत. नाशिकला गेल्यानंतर विविध क्षेत्रातील मित्र परिवार त्यांनी जोडला. अनेक क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा घनिष्ठ ऋणानुबंध होता. राजकीय क्षेत्रातील धैर्यशीलराव पवार व काकासाहेब वाघ, उद्योगातील लालचंद हिराचंद, साहित्यातील कुसुमाग्रज यांच्यासह अनेक मान्यवरांशी काकांचे मैत्र जुळले होते. सिन्नर व्यापारी बँकेच्या कुबेर या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी लालचंद हिराचंद यांच्यासारखे दिग्गज उद्योजक केवळ काकांमुळेच आम्हाला आणता आले.
सन १९९४ मध्ये माझे वडील शंकरशेठ वाजे यांचे निधन झाल्यानंतर काका सांत्वनासाठी सिन्नरला आले आणि तेव्हापासून त्यांचे-माझे सूर जमले ते शेवटच्या क्षणापर्यंत जुळलेलेच राहिले. काका माझे मार्गदर्शक बनले. माझ्या आयुष्यात त्यांना कायमच आदराचे स्थान राहिले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय माझा कुठलाही निर्णय झाला नाही. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला सकाळी सातला शुभेच्छा देण्यासाठी मोबाईलला पहिली रिंग नेहमीच काकांची राहिली आहे. दर पंधरा दिवसांनी काकांना भेटायला जाणे हा माझा जणू दिनक्रमच बनला. मध्यंतरीच्या काळात कधी नाशिकला गेलोच तर काकांना भेटल्याशिवाय कधीही सिन्नरला परतलो नाही.
काका जुन्या आठवणींमध्ये रमायचे. सिन्नरच्या बारीकसारीक घटनांवर त्यांचे लक्ष असायचे अन् त्यावर ते मोकळेपणे बोलायचे. देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करायचे. एखाद्या पुस्तकावर बोलायचे. अमूक पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले, ते वाचले की नाही? त्यात नेमके काय म्हटले आहे? ते वाचणे का गरजेचे? अशी चर्चा करत पुस्तकाच्या प्रकाशकाचे नावही सांगून टाकायचे. अनेक साहित्यिकांवर, त्यांच्या साहित्यावर चर्चा व्हायची. कुटुंबातील क्षेम-कुशल विचारायलाही ते कधीच विसरायचे नाहीत. त्यांचे वाचनाचे वेड कधीच कमी झाले नाही. शेवटच्या वर्ष-दीड वर्षात त्यांची दृष्टी थोडी कमजोर झाली होती. तरीही भिंगाची काच (बालपणाची आठवण) घेऊन वृत्तपत्राचे मथळे वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
वाचनासाठी त्यांची सुरू असलेली तगमग पाहून मन अस्वस्थ व्हायचे. आता माझेही वाचन कमी झाल्याची खंत मी त्यांच्याजवळ व्यक्त केली. डोळे साथ देत नसल्याचे सांगत त्यांची अस्वस्थता कमी करण्याचा मी प्रयत्न करायचो. राजूला नाशिकच्या खासदारकीची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब नाशिकला आले होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि शिवसेनेच्या सर्वेमध्ये राजूचे नाव आले असले तरी तुमच्या कोअर कमिटीमध्ये मात्र त्याच्या नावाचा विचार करू नका, असे मी त्यांना सुचवले. राजूने खासदारकीची निवडणूक लढावी, असे साहेबांनी मला सुचवले.
मात्र मी, ‘ही निवडणूक आम्हाला आर्थिकदृष्ट्या झेपणार नाही. त्यामुळे तुमच्या कोअर कमिटीसमोर त्याचे नाव आल्यास आपण त्याच्या नावाचा विचार करू नये’ अशी विनंती त्यांना केली. त्यानंतर नेहमीप्रमाणे तेथून काकांना भेटायला गेलो. पवार साहेबांबरोबर झालेली चर्चा त्यांना सांगितली. काकांनी मला समजावले की, राजूला उमेदवारी मिळत असेल तर नाही म्हणून नका, आलेली संधी सोडू नका. यानंतर आठ दिवसांतच पवार साहेबांचा फोन आला आणि राजूची उमेदवारी निश्चित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
काकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली तेव्हा मीही आजारी होतो. त्यामुळे त्यांना भेटायला जाऊ शकलो नव्हतो. अशा परिस्थितीतही त्यांना माझी आठवण आली. त्यांनी मला फोन करून भेटायला बोलावले. दुसर्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. काका जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले होते. जवळपास तासभर त्यांनी माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ही आपली शेवटची भेट असेल अशी पुसटशीही शंका मला त्यावेळी आली नाही. माझ्या भेटीनंतर दहा दिवसांत काका कुणाशीही बोलले नाहीत. मग त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. मन आणि विचारांचीही श्रीमंती जपणार्या काकांना जाऊन एक वर्ष झाले यावर विश्वासच बसत नाही. वै. काकांना माझी भावपूर्ण आदरांजली!





