Thursday, July 30, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आज राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीमध्ये गुवाहाटीत लढत; जाणून घ्या,...

IPL 2026 : आज राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीमध्ये गुवाहाटीत लढत; जाणून घ्या, हेड टू हेड रेकॉर्डसह हवामानाचा अंदाज

गुवाहाटी । Guwahati

आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात आज दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील हा थरार राजस्थानचे घरचे मैदान असलेल्या गुवाहाटी येथील एसीए स्टेडियमवर रंगणार आहे. विशेष म्हणजे, या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. राजस्थानने सलग तीन विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर बंगळुरूनेही आपले दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे.

- Advertisement -

गुवाहाटीतील खेळपट्टीचा इतिहास पाहता, येथे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी मोठी धावसंख्या उभारली आहे. मात्र, जसा सामना पुढे सरकतो, तशी खेळपट्टी संथ होत जाते, ज्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. क्रिकेटप्रेमींना हा सामना स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे मोठे सावट आहे. हवामान खात्याने गुवाहाटीमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. ‘अॅक्यूवेदर’च्या अहवालानुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची ५६ टक्के शक्यता असून दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळू शकतात. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास दोन्ही संघांच्या रणनीतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

दोन्ही संघांच्या ‘हेड टू हेड’ आकडेवारीवर नजर टाकल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पारडे किंचित जड दिसते. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण ३३ सामने झाले असून, त्यापैकी १७ सामन्यांत बंगळुरूने तर १४ सामन्यांत राजस्थानने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, राजस्थानच्या घरच्या मैदानावरही बंगळुरूने ८-७ अशी आघाडी घेतली आहे. मात्र, राजस्थान रॉयल्सचा संघ जेव्हा प्रथम क्षेत्ररक्षण करतो, तेव्हा त्यांचे रेकॉर्ड ९-६ असे चांगले आहे. याउलट प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला ११ पैकी केवळ ५ वेळाच यश मिळाले आहे.

दोन्ही संघांमधील प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर विजयाची गणिते अवलंबून असतील. राजस्थान रॉयल्सची भिस्त सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्यावर असेल. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटने बंगळुरूच्या फलंदाजीला मोठी मजबूती दिली आहे. बंगळुरूची गोलंदाजीही या मोसमात शिस्तबद्ध दिसत असली, तरी जयस्वालसारख्या आक्रमक फलंदाजांना रोखण्यासाठी त्यांना विशेष डावपेच आखावे लागणार आहेत. आजच्या या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक कोण साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....