शिर्डी । Shirdi
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित गुन्ह्यांची व्याप्ती आता केवळ अत्याचार किंवा फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नसून, यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. यामुळे चाकणकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर यांना यापूर्वीच महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाने चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता आधीच वर्तवली होती. मात्र, आता थेट त्यांच्या बहिणीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे. प्रतिभा चाकणकर यांना पुढील पाच दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात शिर्डी येथील समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर यांची एकूण चार बँक खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी दोन खाती ही प्रतिभा यांच्या स्वतःच्या नावे असून, उर्वरित दोन खाती त्यांच्या मुलांच्या नावे आहेत. या चारही खात्यांमधून गेल्या काही काळात तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. इतकी मोठी रक्कम खात्यात कोठून आली आणि हे व्यवहार नेमके कोणाशी झाले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या व्यवहारांचा संबंध अशोक खरात याच्या काळ्या पैशांशी असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, समता पतसंस्थेत अशोक खरात हा ‘नॉमिनी’ असलेली तब्बल १०० खाती आहेत. तसेच सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली ३२ खाती आढळून आली आहेत. यांपैकी समता पतसंस्थेतील खात्यांची चौकशी शिर्डी पोलीस करत आहेत, तर जगदंब पतसंस्थेतील खात्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे. या मोठ्या आर्थिक जाळ्याचा प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यांशी काय संबंध आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.
शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे नोटीस पाठवली आहे. त्यांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून, या काळात त्यांना पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. भोंदूबाबा खरात याच्या प्रकरणातील हा आर्थिक घोटाळा आता अधिक गडद होत असून, पोलिसांनी चाकणकर कुटुंबियांभोवती चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या चौकशीतून नेमकी कोणती माहिती बाहेर येते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





