Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनमाड नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ६६.५२ टक्के मतदान; उद्या मतमोजणी

मनमाड नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ६६.५२ टक्के मतदान; उद्या मतमोजणी

मनमाड | प्रतिनिधी Manmad

- Advertisement -

सहा महिन्यांपूर्वी निवडणुकीदरम्यान शिवसेना (उबाठा) उमेदवाराचे अचानक झालेल्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आलेली मनमाड नगरपरिषदेच्या क्र. १० मधील दोन जागांसाठी शनिवारी (दि.२०) पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिंदे शिवसेना, उबाठा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इस्लाम पार्टीच्या उमेदवारांसह पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी ४,४२४ मतदारांपैकी पैकी २,९४३ (६६.५२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. साडेपाच वाजेनंतरदेखील मतदान केंद्रावर रांगा होत्या.

मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी मतदान केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मतदान केंद्र आणि प्रभाग क्र. १० ला एकप्रकारे छावणीचे स्वरूप आले होते. रविवारी (दि.२१) मतमोजणी केली जाणार असून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे सकाळी ११ वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

नगर परिषदेच्या ३३ जागांसाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी प्रचारादरम्यान प्रभाग १० मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रभाग १० मधील दोन्ही जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. अखेर सात महिन्यांनंतर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभाग १० अ मधून स्व. नितीन वाघमारे यांच्या पत्नी ज्योती वाघमारे यांनी उबाठातर्फे उमेदवारी अर्ज दखल केला. त्यांच्याविरोधात शिंदे शिवसेनेचे राजेंद्र पगारे, काँग्रेसचे सचिन पगारे, अपक्ष सुरेखा मोरे अशी चौरंगी तर प्रभाग १० ब मधून शिंदे शिवसेनेच्या अलका रसाळ, अजितदादा राष्ट्रवादीच्या मुमताज शेख, उबाठाच्या शेख शिफा जावीद, इस्लाम पार्टीच्या शेख अफरीन, अपक्ष हर्षल पाटील, शेख शमा असे सहा उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुम कांदे, युवासेनेचे फरहान खान, नगराध्यक्ष योगेश पाटील, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसेंसह सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. आमदार कांदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅलीदेखील काढण्यात आली होती. तिकडे उबाठाच्या उमेदवारांकरिता शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, वर्सोवाचे आमदार हारून खान, ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, शहरप्रमुख माधव शेलार यांनी प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार असतानादेखील समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांनीच नव्हे तर एकाही नेत्यांनी प्रचार केला नाही. सर्वांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हीच परिस्थिती काँग्रेसचीदेखील होती. मालेगाव महापालिकेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर इस्लाम पार्टीने प्रथमच मालेगावच्या बाहेर पालिका निवडणुकीत उमेदवार दिला होता.

नोव्हेंबरमध्ये थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ३१ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात शिंदे शिवसेनेने नगराध्यक्षसह २६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. प्रभाग क्र. १० हा संवेदनशील मानला जातो. त्यामुळे निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व १० उमेदवारांना सुरक्षा म्हणून प्रत्येकी एक पोलीस देण्यात आला होता. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला संथगतीने मतदान सुरू होते. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली. सकाळपासून शिंदेसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष फरहान खान, नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका तळ ठोकून होते. उबाठाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...