Friday, May 3, 2024
Homeधुळेशिरपूर तालुक्यात पुन्हा 20 लाखांचा गांजा जप्त

शिरपूर तालुक्यात पुन्हा 20 लाखांचा गांजा जप्त

शिरपूर । प्रतिनिधी Shirpur

शिरपूर तालुक्यात पोलिस, महसूल व वनविभागाने गांजा शेतीविरोधात शोध मोहिम सुरू केली आहे. काल मौजे चिलारे व लाकडया हनुमान गाव शिवारात वनजमिनींची तपासणी करण्यात आली. त्यात एकाठिकाणाहुन 12 लाखांची गांजाची झाडे व दुसर्‍या ठिकाणाहून 10 लाखांचा सुका गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन व वनविभाग यांच्या संयुक्तपणे काल दि. 26 रोजी शिरपुर तालुका परिसरात गांजा शेती विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेसाठी चार विशेष पथके तयार करण्यात आली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर अनिल माने, साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महीराळे, तहसिलदार आबा महाजन, सहाय्यक वनसंरक्षक अमित जाधव यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि अभिषेक पाटील, थाळनेरचे सपोनि सचिन साळुंखे व शिरपुर उपविभागातील एकुण 10 पोलीस अधिकारी व 65 पोलीस कर्मचारी यांच्यासह शिरपुर महसुल विभागातील 3 नायब तहसिलदार, 13 मंडळाधिकारी व तलाठी, सांगवी वनपरिक्षेत्रीय अधिकारी श्री. मेश्राम व त्यांचे 10 वनपाल, वनरक्षक यांचा समावेश होता.

पथकांनी शिरपुर तालुक्यातील वनपट्टे व महसुल जमीनींची तपासणी करुन अवैधपणे गांजांची लागवड करणार्‍यां शोध घेण्यात आला. मौजे चिलारे व लाकडया हनुमान या गाव शिवारातील वनजमिनींची तपासणी दरम्यान रतनसिंग पाडवी याच्या शेतात गांजाची झाडांची लागवड केलेच्या आढळुन आले. तसेच लाकडया हनुमान गावाच्या शिवारात वनजमीनीवर राहुज्या नाना पाडावी याच्या शेतात वाळत घातलेला सुका गांजा मिळुन आल्याने दोघांविरुध्द एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

रतनसिंग पाडवी याच्या वनशेतीमधील लागवड केलेली एकुण 605 किलो गांजाची झाडे (प्रती किलो 2 हजार रुपये किंमतीचे) जप्त करण्यात आली. त्याची किंमत 12 लाख 10 हजार रुपये आहे. तर राहुज्या पाडवी याच्या शेतात वाळत घातलेला 163 किलो वजनाचा (प्रती किलो 5 हजार रुपये किंमतीचा) सुका गांजा मिळून आला. त्यांची किंमत एकुण 8 लाख 15 रूपये असून दोन्ही ठिकाणाहुन एकुण 20 लाख 25 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान वरील दोन्ही संशयीत आरोपींना पथकाच्या कार्यवाहीची चाहुल लागल्याने ते शेतातुन पळुन गेले. त्यांचा शोध सुरु आहे. ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, प्रांतधिकारी विक्रत बांंदल, सहा. वनसंरक्षक श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुढे ही वेळोवेळो अशा मोहीमा राबविण्यात येणार आहे.

वनपेट्ट शासन जमा करण्याची होणार कारवाई

वनविभागाकडुन संबंधीत गांजा लागवड करणार्‍यां शेतकर्‍यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असुन त्यांचे वनपट्टे शासन जमा करण्याची कार्यवाही वनविभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्रीय अधिकारी यांनी कळविले आहे. तसेच यापुर्वी पोलीस विभागाकडुन गांजा लागवडी बाबत केलेल्या कार्यवाहीची माहीती वनविभागाकडुन घेण्यात येणार असुन संबंधीत कसुरदार व्यक्तींची वनपट्टयांवर देखील कार्यवाही केली जाणार आहे. यापुढे वनविभागाकडुन वनजमिनी व वनपट्टयावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच तहसिलदारांनी महसुल जमिनीवर गांजा लागवडबाबत पाहणी करण्याबाबत तलाठी व मंडळाधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या