नाशिक, २२ऑगस्ट 2026(जिमाका वृत्तसेवा)
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेसोबत खासगी रुग्णालये, डॉक्टर आणि विविध वैद्यकीय संघटनांचा प्रभावी समन्वय साधण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत भाविकांना तत्पर, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत असून, यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
हॉटेल एक्सप्रेस इन येथे नाशिक जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना व वैद्यकीय संस्थांच्या प्रतिनिधींशी मंत्री आबिटकर यांनी संवाद साधला. यावेळी आरोग्यसेवा नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, राज्य आरोग्य यंत्रणेचे कार्यकारी संचालक डॉ. आर. एस. आडकेकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप, आय एम ए चे अध्यक्ष डॉ विशाल पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी, डॉ. आनंद पवार यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, नाशिक होमिओपॅथिक असोसिएशनचे पदाधिकारी, विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधींनी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, रुग्णालय नोंदणी, विमा प्रक्रियेचे सुलभीकरण, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स कायदा, PCPNDT प्रक्रियेचे डिजिटायझेशन यासह विविध प्रश्न मांडले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. डॉक्टर, वैद्यकीय संस्था आणि शासन यांच्यात परस्पर विश्वास व सातत्यपूर्ण संवाद राहिल्यास आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडविता येतात. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपले प्रश्न शासनासमोर मोकळेपणाने मांडावेत. शासनाच्या पातळीवर जे प्रश्न सोडविणे शक्य आहे, त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
वैद्यकीय क्षेत्रातील कायदे व नियमांची अंमलबजावणी करताना डॉक्टरांना अनावश्यक अडचणी निर्माण होणार नाहीत, तसेच रुग्णांच्या हक्कांचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण होईल, याचा समतोल राखणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी कायद्याचे पालन करावे आणि प्रशासनानेही नियमांची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा. वैद्यकीय क्षेत्राकडून प्राप्त होणाऱ्या योग्य सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील.
रुग्णालय नोंदणी, विविध परवानग्या, विमा दावे आणि शासकीय आरोग्य योजनांशी संबंधित प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यावर शासनाचा भर आहे. रुग्णालयांच्या नोंदणीसाठी सिंगल विंडो प्रणाली, विमा प्रक्रियेचे सुलभीकरण आणि विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शासनासाठी महत्त्वाचा आहे. रुग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळाले तर ते अधिक आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे रुग्णसेवा करू शकतील. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देईल, असे त्यांनी सांगितले.
विविध शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि खासगी रुग्णालयांमध्ये समन्वय आवश्यक आहे. योजनांच्या अंमलबजावणीत प्रत्यक्ष पातळीवर येणाऱ्या अडचणी वैद्यकीय संस्थांनी शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांचा अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. नागरिकांना योजनांचा लाभ सुलभतेने मिळणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. रुग्णालय नोंदणी, विविध परवानग्या, शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी, विमा प्रक्रिया तसेच इतर प्रशासकीय बाबी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येत आहे. कायद्याचे पालन करताना वैद्यकीय क्षेत्राला अनावश्यक अडचणी निर्माण होणार नाहीत, तसेच रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य मिळेल, यासाठी शासन सकारात्मक भूमिकेतून निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री आबिटकर म्हणाले की, आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या आरोग्य यंत्रणेसाठी मोठी जबाबदारी आहे. देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य परिस्थितीचा आधीच अभ्यास करून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्याच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका व्यवस्था, ट्रॉमा केअर, रुग्णालयांमधील बेडची उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, औषधांचा पुरवठा तसेच गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येईल. आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय आणि खासगी क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळ, तज्ज्ञता आणि पायाभूत सुविधांचा समन्वित वापर करणे आवश्यक आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने या समन्वयाला अधिक व्यापक स्वरूप देऊन आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार उपलब्ध होण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येईल. वैद्यकीय संस्थांनी शासनाच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही मंत्री आबिटकर यांनी केले.
कुंभमेळ्याच्या आरोग्य व्यवस्थेत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णालयीन सुविधांचा प्रभावी वापर करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे नियोजन करावे. प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय व खासगी रुग्णालये आणि डॉक्टर संघटना यांच्यात सक्षम समन्वय यंत्रणा निर्माण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व क्षमतेचा योग्य समन्वय साधल्यास आगामी कुंभमेळ्यात नाशिकची आरोग्य व्यवस्था देशासाठी आदर्श ठरू शकते. यासाठी डॉक्टर संघटनांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुलभ, पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, या उद्देशाच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय क्षेत्राचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी आयएमए चे अध्यक्ष डॉ विशाल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अतिरिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निलेश पाटिल यांनी मानले.




