अंबासन | वार्ताहर Ambasan
गत तीन-चार दिवसापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मोसमखोर्यास वरदान ठरलेले हरणबारी धरण आज सकाळी तुडूंब भरल्याने सांडव्यावरून पाणी कोसळू लागल्याने मोसम नदी प्रवाहीत झाली आहे. बागलाण तालुक्यात अद्याप मुसळधार पाऊस होत नसल्याने खरीप पेरणी केलेल्या शेतकर्यांची चिंता वाढली असली तरी हरणबारी धरण शंभर टक्के भरल्याने पिण्याबरोबर शेतीसिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याने मोसमखोर्यास दिलासा मिळाला आहे.
११६६ द.ल.घ.फुट जलसाठ्याची क्षमता असलेल्या हरणबारी धरणातील गाळामुळे पाणीसाठा कमी झाला होता. मात्र गत दोन वर्षापासून हरणबारीतून मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा करण्यात आल्याने जलसाठा वाढला आहे. तीन दिवसापुर्वी हरणबारी धरणात ९३५ द.ल.घ.फुट सुमारे ८०.१९ टक्के जलसाठा होता. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाणी केव्हा वाहते याची प्रतिक्षा मोसमखोर्यात केली जात होती. बागलाणात रिमझिम पाऊस पडत असला तरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी गत दोन-तीन दिवसापासून होत असल्याने हरणबारी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती.
धरणात मोठ्या प्रमाणात येत असलेल्या पाण्यामुळे आज सकाळी हरणबारी १०० टक्के भरून सांडव्यावरून ३० क्युसेस पाणी मोसम पात्रात पडण्यास प्रारंभ झाल्याने मोसम नदी प्रवाहीत झाली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास मोसम नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
बागलाणसह मोसम खोर्यात अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत देखील बहुतांश शेतकर्यांनी खरीपाची पेरणी दमदार पाऊस पडेल या अपेक्षेवर आटोपली आहे. हरणबारी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठावरील हरणबारी गावासह मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, भडाणे, तांदुळवाडी, सोमपूर, जायखेडा, ब्राम्हणपाडे, आसखेडा, वाघळे, राजापूर पाडे, उत्राणे, द्याने, नामपूर, मोराणे, अंबासन, वळवाडे, वडनेर-खाकुर्डी, अजंग, वडेल, वडगाव, काष्टी व डाबली या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजना पुन्हा जिवंत होणार असल्याने मोसमखोर्यासह काटवन भागातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर होण्याबरोबर या पाण्याचा शेती सिंचनास देखील लाभ मिळणार असल्याने ग्रामस्थांसह शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
दमदार पावसाचीप्रतिक्षा कायम
बागलाण तालुक्यात रोहिणी-मृग नक्षत्र कोरडे गेल्यावर आद्रा नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. तीन-चार वेळा झालेल्या पावसावर बहुतांश शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र अद्याप शेतात पाणी साचेल अशी पर्जन्यवृष्टी झाली नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. पावसाची उघडकीप घेत रिपरिप सुरू असल्याने त्याचा लाभ पिकाऐवजी तण वाढविण्यात होत असल्याने शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे. नद्या, नाले ओसंडून वाहतील अशी पर्जन्यवृष्टी अद्याप झाली नसल्याने विहिरींना देखील पाणी उतरलेले नाही. हरणबारी धरण भरल्याने प्रवाहीत झालेल्या मोसम नदीचा लाभ काठावरील गावांना व शेतकर्यांना मिळू शकणार असला तरी तो पुरेसा राहणार नसल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा मोसमखोर्यात अद्याप केली जात आहे.
यंदा गेल्या वर्षापेक्षा मोसम खोर्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. तरीसुद्धा पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसात शेतकर्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. आता अंतर मशागतींना वेग आला असून दोन दिवसापासून होत असलेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मोसम खोर्यासाठी वरदान ठरलेले हरणबारी धरण आज सकाळी तुडूंब भरल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पाऊस कमी असला तरी मोसम खोर्यासाठी हरणबारी धरण हे वरदान आहे. त्यामुळे कमी पावसाचे दुःख विसरून हरणबारी भरल्याचा आनंद परिसरातील शेतकर्यांना झाला आहे.
भाऊसाहेब अहिरे,माजी सभापती, बाजार समिती




