Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचांदोरीत खंडेराव मंदिराला पुराचा वेढा

चांदोरीत खंडेराव मंदिराला पुराचा वेढा

चांदोरी | वार्ताहर Chandori

- Advertisement -

दारणा व गोदावरी नदीच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, चांदोरी, सायखेडा आणि गोदाकाठावरील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला दुसर्‍यांदा पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असून, चांदोरी येथील ऐतिहासिक खंडेराव मंदिराला पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला आहे. मंदिर परिसर जलमय झाला असून नदीचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने परिसरातील नागरिक नदीकाठावर गर्दी करून पूरस्थिती पाहत आहेत. मात्र प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आणि नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

गोदावरी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींमध्येही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नदीचा प्रवाह आणखी वाढण्याची शयता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे आणि तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि ग्रामपंचायत यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळावे आणि सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन…
नदीपात्रात व पुराच्या पाण्यात जाणे टाळावे. पुलांवर अनावश्यक गर्दी करू नये. लहान मुलांना नदीकाठावर जाऊ देऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. गरज भासल्यास तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला...