सटाणा-डांगसौंदाणे | वार्ताहर Satana / Dangsoundane
पाणलोट क्षेत्रात गत काही दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पर्जन्यंवृष्टीमुळे केळझर व दसाणे धरण तुडूंब भरून ओव्हरफ्लो झाल्याने आरमसह हत्ती नदी दुथडी वाहू लागल्याने आरमसह दसाणे खोर्यातील ग्रामस्थ व शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, केळझर व दसाणे धरण ओव्हर फ्लो होवून वाहू लागल्याने खरीप हंगामाला बळ मिळण्याबरोबर रब्बी हंगामाच्या दृष्टीकोनातून देखील शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भिज पावसाच्या संततधारेने खरीप पिकांना जीवदान लाभले असले तरी अद्याप विहिरींना पाणी उतरेल अशा मुसळधार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
गत तीन-चार दिवसापासून पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे ५७२ द.ल.घ.फुट क्षमतेचे केळझर (गोपाळसागर) धरण आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने आरम नदीस पुर आल्यांने आरम खोर्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. गत वर्षी ६ जुलैस भरलेले केळझर यंदा १५ दिवस विलंबाने २३ जुलैस भरून ओसंडून वाहत आहे.
केळझर धरणावर अवलंबून असलेल्या २० ते २५ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणार्या पाणीटंचाईच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात मात झाली आहे. केळझर, डांगसौंदाणे, ततानी, भावनगर, करंजखेड, साकोडे, बुंधाटे, चाफ्याचे पाडे, दहिंदुले, निकवेल, औंदाणे, वटार, विंचुरे, जोरण, कपालेश्वर, मोरकुटे, भिलदर, चौंधाणे, कंधाने, निरपूर, खमताने, मुंजवाड, मळगाव, आराई तसेच सटाणा शहराला या धरणाच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे.
धरणाच्या एकमेव केळझर डाव्या कालव्यामुळे भिलदर, कार्हळेपाडा, डोंगरेज, वटार, वीरगाव, वनोली, किकवारी व विंचूर परिसरातील गावांतील शेतीला रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकर्यांमध्येही समाधानाचे वातावरण पसरले आहे.
या धरणावर सटाणा बागायतदार संस्था, बागायतदार पाणी वापर संस्था (आराई) आणि गोपाळराव मोरे पाणी वापर संस्था (चौंधाणे) अशा तीन पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. धरणातून सध्या आरम नदीपात्रात ३८८ युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठावरील नागरिकांनी तसेच नदीपात्रात जाणार्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि पूरस्थितीत नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन केळझर धरणाचे उपअभियंता प्रशांत पाटील यांनी केले आहे.
दसाणे खोरे सुखावले
पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे ३ हजार ७४० घनमीटर क्षमता असलेले दसाणे लघुप्रकल्प धरण आज सकाळी तुडूंब भरून ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती नदीस पुर येवून ती दुथडी वाहू लागली आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने दसाणेसह केरसाने, औंदाणे, वीरगाव, वनोली, तरसाळी, वीरगाव पाडे आदी गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना जीवदान लाभण्यासह परिसराच्या शेतीसिंचनाचा प्रश्न सुटल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बागलाणात भिज पावसाने घरांची पडझड
बागलाण तालुक्यात गत तीन दिवसापासून उघडकीप घेत पावसाची संततधार सुरू आहे. या भिज पावसाने खरीप पिकांना जीवदान लाभले असले तरी तालुक्यात विविध गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. कंधाणे येथील चिंधा पिसरू पवार, कांद्याचा मळा येथील पंडित गणपत सोनवणे, पोफीर येथील शिवाजी पांडू अहिरे, जुने निरपूर येथील चिंधा नथू पवार, गोळवाड येथील काळूबाई बाळू देशमुख, कंधाणे येथील विठ्ठल अण्णा सोनवणे व तांदुळवाडी येथील मधुकर पंडित भामरे यांच्या घराच्या भिंती कोसळून घरासह संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याने या आपद्ग्रस्तांना महसुल विभागाने तातडीने पंचनामे करीत शासन नियमानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.




