नाशिक । प्रतिनिधी Nashik
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल सोमवारी (दि.22) जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवाराच्या मोर्चेबांधणीमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवाराने थेट प्रचार केला नसला तरी त्यांची उमेदवारी कायम असल्याने या लढतीतील सस्पेंस शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला आहे. आता नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या या परीक्षेत कोण पास होणार, याचा उलगडा अवघ्या काही तासांत होईल.
प्रशासनाने मतमोजणीची पूर्ण तयारी केली असून, सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे व अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्यामध्ये चुरस असल्याने या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. भाजप बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी महायुतीचे दराडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.
असे असेल विजयी मतांच्या कोट्याचे गणित
या निवडणुकीत एकूण 619 मतदारांपैकी 618 जणांनी मतदान केले आहे. विजयी उमेदवारासाठीचा कोटा निश्चित करण्याचे सूत्र खालीलप्रमाणे असेल. सध्याची स्थिती जर सर्व 618 मते वैध ठरली, तर त्याच्या 50 टक्के (309) अधिक 1 म्हणजेच 310 मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक असेल. अवैध मतांचा फरक : समजा मतमोजणी दरम्यान वरची 18 मते अवैध ठरली, तर एकूण वैध मते 600 होतील. अशा स्थितीत 600 च्या 50 टक्के (300) अधिक 1 म्हणजेच 301 मतांचा कोटा निश्चित केला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी वैध मतांवरूनच कोट्याची अंतिम निश्चिती होईल.
अशी पार पडणार मतमोजणी प्रक्रिया
सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी 4 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिली पायरी: प्रत्येक टेबलवर सर्वात आधी वैध आणि अवैध मते तपासून वेगळी केली जातील. त्यानंतर वैध मतांचे 50-50 चे गठे तयार केले जातील. पहिली फेरी: निवडणूक रिंगणात 3 उमेदवार असल्याने त्यांच्या नावाच्या बॉक्समध्ये ’प्रथम पसंतीची’ मते टाकली जातील. पहिल्या फेरीतच एखाद्या उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला, तर तो विजयी घोषित होईल.
दुसरी फेरी (गरज पडल्यास): पहिल्या फेरीत कोटा पूर्ण न झाल्यास, तिसर्या क्रमांकावरील (सर्वात कमी मते मिळालेल्या) उमेदवाराला प्रक्रियेतून बाद केले जाईल. त्यानंतर त्याच्या कोट्यातील ’दुसर्या आणि तिसर्या पसंतीची’ मते इतर उमेदवारांच्या खात्यात वर्ग करून कोटा पूर्ण केला जाईल.
पक्षीय बलाबल: कोणाकडे किती मते?
या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड दिसत असले तरी अंतर्गत बंडाळीमुळे चुरस वाढली आहे. एकूण 619 मतदारांचे पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे आहे.
राजकीय पक्ष/गट मतदार संख्या
भाजप – 188
शिवसेना (शिंदे गट) – 171
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 107
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 45
इस्लाम पार्टी – 35
एमआयएम – 21
काँग्रेस – 13
इतर व अपक्ष – 39
एकूण मतदार – 619
कोटा पूर्ण झाल्यास 2 तासांत निकाल
मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ठीक 8 वाजता मोजणीला सुरुवात होईल. एकूण 4 टेबल्स लावण्यात आले असून, वैध मतांचे 50-50 चे गठे बांधूनच मोजणी केली जाईल. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण झाला तर अवघ्या 2 तासांत निकाल हाती येईल, अन्यथा पुढील फेर्यांसाठी वेळ लागू शकतो.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी




