Sunday, November 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : डॉ. प्रवीण तोगडियांच्या नाशिक दौर्‍याचा अन्वयार्थ!

राज-का-रण : डॉ. प्रवीण तोगडियांच्या नाशिक दौर्‍याचा अन्वयार्थ!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची प्रवीण तोगडियांबरोबरची जवळीक हा भाजपला डिवचण्याचा डाव असू शकेल का, याबाबत लागलीच काही सांगता येणार नाही. परंतु जेथे पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे वळवायचे आहे, अशा ठिकाणी या माध्यमातून एक वेगळी स्पेस किंवा दबावगट तयार करण्याचा हेतू यामागे असू शकेल. तरीही सातारा, सांगली; तत्पूर्वी पुणे, ठाणे, नवी मुंबई, संभाजीनगर आदी अनेक ठिकाणी या पक्षांमध्ये सध्या ज्या काही ठिणग्या उडत आहेत, त्याचा भविष्यात भडका उडणारच नाही, असे नाही. ही कदाचित त्याची रंगीत तालीमही असू शकेल.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं सांगितलं जातं. अधूनमधून काही विषयांवरून खटके उडतात; स्थानिक पातळीवरील नेते-कार्यकर्ते आपापसात झुंजतात. तेव्हाही आमच्यात काही वाद नाहीत, सगळं कसं छान चाललं आहे, विरोधकांना आमच्यातील सौहार्द्र पाहावत नाही, अशी सारवासारव केली जाते. सत्तेसाठी हे सौहार्द गरजेचे असल्याचे लोकांनाही कळतं. परंतु अलीकडे हे असं या मंडळींना वारंवार सांगावे लागते, हे मात्र काही सामान्य नाही. कुठेतरी काहीतरी बिनसतंय असं राजकीय वर्तुळात बोलले जाते. काही घटना अशा घडतात की, त्या या बिनसत चाललेल्या संबंधाच्या पुराव्यादाखल उभ्या केल्या जातात. या आठवड्यात तर लागोपाठ अशा काही घटना घडत आहेत की, हे मित्रपक्ष आहेत की एकमेकांचे उट्टे काढणारे छुपे शत्रू, असा प्रश्न पडला.

सातारा व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोबत घेत भाजपला सत्तेपासून दूर रोखले. शेजारच्या सांगली जिल्हा बँकेत तर भाजपला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेने काँग्रेसला केवळ सोबत घेतले नाही, तर अध्यक्षपदही बहाल केले. सहकारात पक्षीय राजकारण नव्हे तर गटा-तटाचे राजकारण चालते, असे यावर एखादा उत्तर देईलही. त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही. परंतु या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तत्पूर्वी जे काही रामायण घडलं त्याचा हा उत्तरार्ध आहे, हे समजून घेतले तर बरेच काही ध्यानात येते. शिवाय, काही कड्या जुळविल्या तर त्यातील राजकारणही समजून घेता येते.

सातारा जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी तेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांना बाजूला ठेवण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला गेला होता. साक्षात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हा पोलीसप्रमुखांनी हस्तक्षेप केल्याचाही आरोप होता. एवढेच नव्हे तर पालकमंत्री शंभुराज देसाई यांना बळाचा वापर करून बाहेर काढले गेले होते; त्यांना मारहाण झाल्याचेही तेव्हा आरोप झाले होते. हा अपमान गिळून तेव्हा शंभुराज तसेच मंत्री मकरंद पाटील शांत बसले. भाजपचे जयकुमार गोरे यांनी केलेल्या या कारस्थानाचे उट्टे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या दोघांनी नेमकेपणाने काढले. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर हे अध्यक्षस्थानी तर शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.

अर्थात, अध्यक्ष झालेले उदयसिंह पाटील हे शंभुराज देसाई यांचे साडू आहेत. त्यामुळे सदर बँकेवर देसाईंची, पर्यायाने शिवसेनेची सत्ता चालेल. दस्तुरखुद्द शंभुराज देसाई हेदेखील भाजपच्या पाटणकरांना धूळ चारून बँकेत पोहोचले तेव्हा देसाई घराण्यातील व्यक्ती तब्बल ४६ वर्षांनंतर बँकेत पाय ठेवती झाली. सांगलीमध्येदेखील महायुती व महाविकास आघाडी यांना समसमान दहा जागा मिळालेल्या असताना समझोता होऊन काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्षपदी तर शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.

भाजपला बाजूला ठेवण्यात येथे त्यांच्या मित्रपक्षांनी मदत केल्याचे दिसते. काँग्रेसला सुमारे २२ वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद मिळवता आल्याने विश्वजित कदम यांचे पक्षात वजन वाढणार आहे. या निवडणुकांकडे सहकारातील बेरीज-वजाबाकी म्हणून पाहून कदाचित दुर्लक्षही करता येईल. परंतु हे सारे घडत असताना महायुतीतील नेत्यांनी आपापल्या राजकारणाचे जसे भागाकार व गुणाकार केले, त्याला भविष्यात अधिक महत्त्व येईल. म्हणून या घटना तशा किरकोळ वाटल्या तरी त्याकडे अधिक सजगतेने पाहावे लागते.

सहकारातील या बेरीज-वजाबाकीचे पडसाद केवळ आर्थिक संस्थांपुरते मर्यादित नाहीत; तर राजकीय वर्तुळातील काही सूक्ष्म हालचालींकडेही लक्ष वेधून घेतात. थेट वा मैत्रीपूर्ण लढतींमध्ये भांडणे दिसतातच; परंतु काही घटना अशा घडतात की त्यात नेमके यांचे काय चालले आहे, याचा शोध घ्यावा लागतो. त्याचे असे झाले की, एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषदेचे सर्वेसर्वा असलेले व भारतवर्षातील अत्यंत आक्रमक तरुण चेहरा म्हणून ख्यातकीर्त झालेले डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गेल्या आठवड्यात नाशिक या पवित्र क्षेत्री येऊन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या निवासस्थानी पाहुणचार घेतला; कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. वरवर पाहता यात तसे वावगे वाटण्याचे कोणाला काही कारण नाही.

परंतु गेल्या काही वर्षांतील तोगडिया यांची राजकीय चाल माहीत असणार्‍यांना या भेटींमागे बरेच काही सापडले असणार. विश्व हिंदू परिषद व राममंदिर आंदोलन यांचा किती घनिष्ठ संबंध आहे, हे वेगळे काही सांगायला नको. तर अशा या विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले प्रवीण तोगडिया हे मध्यंतरी अहमदाबाद येथील आपल्या घरातून जवळपास दहा-बारा तास बेपत्ता होते. तेव्हा बरीच चर्चा झाली. त्यानंतर ते एका पार्कमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले. रक्तशर्करा कमी झाल्याने आपली शुद्ध हरपली व नंतर काय झाले ते आठवत नाही, असे दस्तुरखुद्द तोगडिया यांनी सांगितल्यानंतरही त्यांच्या या अल्पकालीन बेपत्ता होण्यामागचे गूढ काही पूर्णपणे उलगडलेले नाही.

तत्पूर्वी तोगडिया यांची अधूनमधून मोदींच्या कारभारावर टीका चालली होती. विहिंपच्या निर्णयप्रक्रियेतूनही त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न होत होते. त्यांच्यासंदर्भात संघ परिवारात काहीतरी चालले असावे, अशी चर्चा होत होतीच. त्यातच हा प्रकार घडला. तोगडिया यांनी विहिंपचा राजीनामा देऊन परिवाराशी असलेले संबंध तोडले. काहींच्या मते संघानेच त्यांची हकालपट्टी केली. हा एपिसोड झाल्यानंतर जणू काही घडलेच नाही, असे भासविले गेले. भाजपचा विजयी अश्व चौखूर धावत असल्याने या असल्या घडामोडींकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नव्हता.

नंतर तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तसेच राष्ट्रीय बजरंग दल या समांतर संघटनांची स्थापना केली. या दोन्ही संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. या माध्यमातून ते देशव्यापी दौरे, कार्यकर्ता मेळावे, व्याख्याने घेत असतात. संघ परिवारातून बाहेर पडले असले तरी आक्रमक हिंदुत्व त्यांनी सोडलेले नाही; किंबहुना त्यासाठी ते सतत कार्यरतही राहत आहेत. त्यादृष्टीने सातत्याने मोदींच्या कारभारावरही टीका करीत असतात. हिंदुत्वाच्या मूळ मुद्यांवरून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजूला गेल्याबद्दल ते सतत बोल लावत असतात.

तोगडिया यांची ही पार्श्वभूमी मुद्दाम सविस्तर सांगावी लागली; कारण त्याशिवाय त्यांच्या नाशिकच्या भेटीगाठींचे मर्म कळू शकणार नाही. एवढेच नव्हे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाजप व मित्रपक्षांमध्ये सगळं काही आलबेल नाही, याच्या पुष्ट्यर्थही त्यांचा नाशिकचा दौरा महत्त्वाचा समजला जातो. खरे तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हेदेखील पूर्वाश्रमीचे भाजपचे. नंतर ते शिवसेनेत गेले आणि ठाकरेंनाही जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांची साथ केली. त्यामुळे बोरस्ते यांच्या निवासस्थानी तोगडिया यांनी पाहुणचार घेतला, यात अनेकांना जुन्या संबंधांची उजळणी झाल्यासारखे वाटले असणार. याचबरोबरीने नुकतेच नगरसेवक झालेले कैलास मुदलियार यांच्या निवासस्थानी त्यांनी केवळ भेट दिली नाही तर त्यांचा निवासही तेथे होता.

मुदलियार हेदेखील अनेक पक्ष फिरून सध्या शिंदे गटात स्थिरावले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी अशी सफर त्यांनी केलेली आहे. नाशिकरोड परिसरात बालाजी मंदिराची उभारणी करून त्यांनी काही वर्षांपूर्वी भारतभरातील संतमहंतांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाचारण केले होते. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने तोगडिया यांच्याशी मुदलियार यांचा संपर्क वाढला. मुदलियार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ते जेथे जातात त्या पक्षातील सर्वोच्च वा महत्त्वाच्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत अल्पावधीत बनतात. एकेकाळी ते भुजबळांच्या जवळ होते. त्यांची जवळीक किती होती, हे नाशिककरांना काही वेगळे सांगायला नको.

गंमत म्हणजे, ते नंतर शिवसेनेत गेल्यानंतरही त्यांचे हे संबंध प्रसंगोपात टिकलेले पाहण्यात आले. मध्यंतरी ते राष्ट्रवादीतही गेले तेव्हा अजित पवारांच्या निकट वर्तुळातही जाणे त्यांना सहज शय झाले होते. आता शिंदे गटात गेल्यानंतर तेथेही त्यांनी अल्पावधीत बस्तान बसविले आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांचा पराभव करून ते विजयी झाल्याने भाजपच्या अनेक मुखंडांना किती मिरच्या झोंबल्या असतील हे समजू शकते. परंतु मुदलियार यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन संबंधित प्रभागात भाजपच्याच काठीने त्यांच्या माणसाचा बेत केला. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुदलियार व तोगडिया आणि बोरस्ते या नव्या समीकरणांकडे पाहावे लागेल.

अलीकडे शिंदेंच्या अनेक नेत्यांची अप्रत्यक्ष गोची करण्याचे भरपूर प्रयत्न होत असताना दिसतात. मध्यंतरी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या काही अधिकारांना कात्री लावण्याचा प्रकार घडला होता. अशा अनेक घटना सांगता येतील. परंतु शिंदेंना थेट भाजपला अंगावर घेता येत नसल्याने हे असे काठाकाठाने चाचपडणे चालू असावे. तोगडियांनाही शिंदेंच्या हिंदुत्ववादी विचारांची गरज असणार. महाराष्ट्रात बस्तान बसवायचे असेल तर सध्या तरी शिंदेंशिवाय कोणाला सोबत घेणे शयही नाही, असा विचार यामागे नसेलच असे नाही. शिवाय शिंदेंनाही यानिमित्ताने परस्पर काही मुद्दे निकालात निघणार असतील तर बरेच आहे. ‘पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याची’ उक्ती आपल्याकडे अनेकदा बोलली जाते.

या म्हणीचा असा जिताजागता प्रयोग शिवसेनेने नेमकेपणाने दाखविला असे म्हणता येईल. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची प्रवीण तोगडियांबरोबरची जवळीक हा भाजपला डिवचण्याचा डाव असू शकेल का, याबाबत लागलीच काही सांगता येणार नाही. परंतु जेथे आपली स्वतंत्र ताकद दाखवायची आहे किंवा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे वळवायचे आहे, अशा ठिकाणी या माध्यमातून एक वेगळी स्पेस किंवा दबावगट तयार करण्याचा हेतू यामागे नसेलच असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. तरीही सातारा, सांगली; तत्पूर्वी पुणे, ठाणे, नवी मुंबई, संभाजीनगर आदी अनेक ठिकाणी या पक्षांमध्ये सध्या ज्या काही ठिणग्या उडत आहेत, त्याचा भविष्यात भडका उडणारच नाही, असे नाही. ही कदाचित त्याची रंगीत तालीमही असू शकेल.

मो.९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 200 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दुष्काळी परिस्थितीमुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांबाबत राज्य सरकारच्या सहकार खात्याने सुधारित आदेश काढत क व ड वर्गातील संस्थांच्या निवडणूका उरकण्यास परवानगी दिली...