अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दुष्काळी परिस्थितीमुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांबाबत राज्य सरकारच्या सहकार खात्याने सुधारित आदेश काढत क व ड वर्गातील संस्थांच्या निवडणूका उरकण्यास परवानगी दिली होती. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून स्वतंत्रपणे आदेश काढण्यात आले आहेत. यामुुळे नगर जिल्ह्यातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील 200 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे 25 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर 2026 च्या शासन निर्णयानुसार दुष्काळ जाहीर केलेल्या सर्व तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, या निर्णयामुळे अनेक संस्थांचे संचालक आणि पदाधिकार्यांचा निवडीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शासनाकडे केलेल्या विनंतीनंतर सहकार विभागाने यापूर्वीच्या आदेशात सुधारणा केली आहे.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या नवीन शुद्धिपत्रकानुसार स्थगित निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा अन्य पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्यास अथवा मृत्यू किंवा अपात्रतेमुळे पद रिक्त झाल्यास विद्यमान संचालकांमधून नवीन पदाधिकार्याची निवड करता येईल. तसेच, संचालक मंडळातील जागा रिक्त झाल्यास नवीन संचालकाची निवड करण्याचीही तरतूद केली आहे. तसेच क व ड वर्गातील निवडणूक घेेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील ‘क’ वर्गातील 146 तर 54 ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.




