अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांनंतर संबंधीत ठिकाणी हजर न होणार्या आणि तक्रारींचे कारण पुढे करणार्या शिक्षकांना राज्य सरकारने दणका दिला आहे. बदली झालेल्या नवीन शाळेवर रुजू होणे आता बंधनकारक करण्यात आले असून, या आदेशाला स्थगिती नसतानाही गैरहजर राहणार्या शिक्षकांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचे कडक आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या नव्या फतव्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतरच शिक्षकांच्या तक्रारींचा विचार होणार आहे. बदलीच्या कारणामुळे शाळेवर दांडी मारणार्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बदलीनंतर अशा प्रकारे दांड्या मारणार्या संबंधित शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निर्देश देण्यात आले आहे. तर बदलीविरोधातील तक्रारींवर 30 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 17 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीनंतर प्राप्त होणार्या तक्रार अर्ज / निवेदनांवर कार्यवाही करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक काढले आहे.
यात याबाबत आदेश देण्यात आले असून या आदेशामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या समितीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे 7 दिवसांत अपील करता येणार आहे. विभागीय आयुक्तांनी अपील प्राप्त झाल्यानंतर शक्यतो 30 दिवसांत निर्णय द्यावा. तर विभागीय आयुक्तांचा निर्णय अंतिम राहणार असल्याची माहिती आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक जारी केलं आहे.
महत्वाचे मुद्दे
– बदलीनंतर नवीन शाळेवर रुजू होणे आवश्यक राहणार
– तक्रार अर्जाचा विचार रुजू झाल्यानंतरच होणार
– तक्रार निवारणासाठी 30 दिवसांची कालमर्यादा निश्चित
– समितीच्या निर्णयाविरोधात 10 दिवसांत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार
– विभागीय आयुक्तांनी पुढील 30 दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित
– अंतिम निर्णयानंतर पुन्हा त्याच बदलीसंदर्भातील निवेदनांचा विचार होणार नाही




