अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ 24 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याचे रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 4 लाख 96 हजार हेक्टर असतांना आतापर्यंत केवळ 1 लाख 6 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये नवीन ऊस लागवडीचे प्रमाण अवघे 2.65 टक्के इतके अत्यल्प आहे. ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र 94 हजार 693 हेक्टर असताना केवळ 2 हजार 511.7 हेक्टरवरच लागवड झाली आहे. पुढील काही दिवसांत हे प्रमाण 20 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता धूसर असल्याने साखर कारखान्यांसाठी पुढील गाळप हंगाम अत्यंत आव्हानात्मक व अडचणीचा ठरणार आहे.
दरम्यान, राज्यातील रब्बी पेरण्यांची आकडेवारी पाहता यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षाही अधिक भीषण असल्याचे चित्र पुढे येत आहे. 1972-73 च्या दुष्काळी हंगामात राज्यात 47.29 लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली होती; मात्र यंदा आतापर्यंत केवळ 14 लाख 74 हजार 304 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या सुरू राहिल्या तरी हा आकडा जास्तीत जास्त 20 ते 25 लाख हेक्टरपर्यंतच पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या इतिहासातील ही सर्वांत नीचांकी रब्बी पेरणी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रशांत महासागरात सक्रिय झालेला एल निनो अधिक तीव्र म्हणजेच सुपर एल निनो ठरल्याचे हवामान विभाग व जागतिक हवामान संस्थांनी स्पष्ट केले आहे. याचा थेट परिणाम मोसमी पावसावर होऊन राज्यात सरासरीपेक्षा 19 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस पडला. झालेला पाऊसही प्रामुख्याने जुलैमधील 15 दिवसांतच झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. सद्यस्थितीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचीही शाश्वती राहिलेली नसल्याने रब्बीच्या पेरण्या अत्यंत संथगतीने सुरू आहेत. राज्याचे सरासरी रब्बी क्षेत्र 55 ते 60 लाख हेक्टर असून, यंदा ते 20 ते 25 लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची चिन्हे दिसत नाहीत.
जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणीची स्थिती जिल्ह्यात रब्बी हंगामातील एकूण 23.66 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून यात ज्वारी 1 लाख 62 हजार 909 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 56 हजार 16.05 हेक्टरवर (34.38 टक्के) पेरणी पूर्ण; पिके वाढीच्या अवस्थेत. मका 48 हजार 281.20 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 18 हजार 379.90 हेक्टरवर (38.7 टक्के) पेरणी; पिके वाढीच्या अवस्थेत. हरभरा 1 लाख 8 हजार 345.68 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 18 हजार 406.72 हेक्टरवर (16.99 टक्के) पेरणी; पिके वाढीच्या अवस्थेत. गहू 1 लाख 28 हजार 462 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 11 हजार 275.80 हेक्टरवर (8.78 टक्के) पेरणी; पिके वाढीच्या व मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत. करडई 197. 37 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 22.40 हेक्टरवर (11.35 टक्के) पेरणी; पिके वाढीच्या अवस्थेत.
नवीन ऊस लागवड
94 हजार 693 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 2 हजार 511.7 हेक्टरवर (2.65 टक्के) लागवड. तालुकानिहाय नवीन ऊस लागवड (हेक्टरमध्ये) शेवगाव 1091, नेवासा 213.3, श्रीरामपूर 202, पारनेर 194, राहुरी 183.6, कर्जत 136, अकोले 110.4, संगमनेर 91, श्रीगोंदा 84, राहाता 74, कोपरगाव 66.6, पाथर्डी 64, जामखेड 1.8 आणि अहिल्यानगर 0 हेक्टर अशी एकूण 2 हजार 511.7 हेक्टर नवीन ऊस लागवड नोंदवली गेली आहे.




