पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बळी मंदिरासमोर घडली. विशेष म्हणजे, दिपक गवजीराम चोरमले यांचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. संसाराची स्वप्ने रंगविण्याच्या काळातच काळाने घातलेल्या घावाने चोरमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिपक चोरमले (रा. जेऊर, पो. वाखरी, ता. मालेगाव) हे रविवारी दुचाकीवरून आडगावकडून नाशिकच्या दिशेने जात होते. बळी मंदिरासमोर आले असता ब्रिजच्या दिशेने चुकीच्या बाजूने आलेल्या पिकअपने (एमएच १२ डब्ल्यूएक्स ९३५४) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की दिपक यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर स्थानिक नागरिक संतोष झाडगे यांनी तत्काळ धाव घेत गंभीर जखमी दिपक यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावीत यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दिपक यांचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने उराशी बाळगून जीवनाची वाटचाल सुरू असतानाच झालेल्या या अपघाताने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा वज्राघात झाला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. दिपक यांच्या निधनाची वार्ता जेऊर गावात पोहोचताच शोककळा पसरली.
राँग साईड वाहतुकीचा पुन्हा बळी
रॉंग साईडने भरधाव वाहने चालविण्यामुळे निष्पाप वाहनचालकांचे जीव धोक्यात येत आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या पिकअप चालकाविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अंमलदार देवरे पुढील तपास करीत आहेत.




