नाशिक | प्रतिनिधी Nashik
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI)तर्फे घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिकच्या साक्षी प्रकाश चांडक हिने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. साक्षीने ६०० पैकी ५०२ गुण (८३.६७ टक्के) मिळवत ऑल इंडिया रँक-१ मिळविण्याचा मान संपादन केला.
साक्षी ही नाशिकच्या माइंड स्पार्क अकॅडमीची विद्यार्थिनी असून, तिच्या या यशामुळे नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकॅडमीचे संचालक सीए मयूर संघवी आणि त्यांच्या टीमचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यासपद्धती तसेच साक्षीची मेहनत, सातत्य आणि जिद्द यांचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
सीए इंटरची परीक्षा देशातील आव्हानात्मक व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेच्या तयारीसाठी साक्षीने सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच वेळेचे नियोजन आणि संकल्पनात्मक तयारीवर भर दिला. प्रत्येक टप्प्यावर सीए मयूर संघवी यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाल्याचे तिने सांगितले.
“माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडील, सीए मयूर संघवी सर आणि माइंड स्पार्क अकॅडमीच्या संपूर्ण टीमला जाते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीमुळे हे यश शक्य झाले,” अशी प्रतिक्रिया साक्षीने दिली.
साक्षी ही व्यावसायिक प्रकाश चांडक आणि पूनम चांडक यांची कन्या आहे. निकाल जाहीर होताच माइंड स्पार्क अकॅडमीत जल्लोष करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात साक्षीच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला.
“साक्षीने सुरुवातीपासूनच अभ्यासात चिकाटी, सातत्य आणि हुशारी दाखवली. तिचा ऑल इंडिया रँक-१ हा अकॅडमीसह संपूर्ण नाशिकसाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे सीए मयूर संघवी यांनी सांगितले.
साक्षीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवारासह नाशिकमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




