नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे सर्व खासदार गांधी स्मृतीस्थळाकडे रवाना झाले.या संदर्भात राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे भूमिका स्पष्ट केली. दरम्यान गांधी स्मृतीस्थळ येथे पोहचून त्यांनी स्मृतीस्थळी अभिवादन केले आहे. व त्यानंत सर्व खासदार स्मृतीस्थळावरून परत निघाले आहे.
दरम्यान, गांधी स्मृतीस्थळाकडे जात असताना पोलिसांनी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या तीन बसेस अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी विरोधी पक्षांचा लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील संसदभवनाकडे काढण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. शांततापूर्ण मार्गाने न्याय आणि जबाबदारीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला असून, जखमी विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण विरोधी पक्ष ठामपणे उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. त्यांच्या न्यायाच्या लढ्यात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत,” असेही ते म्हणाले.




