मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (Sub Categorization) करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी राज्यभरातून पाच लाख मातंग बांधव मुंबईत धडकणार आहेत. सकल मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानात (Aazad Maidan) विराट मोर्चा काढण्यात येणार असून उपवर्गीकरणाचा शासन निर्णय होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार आंदोलनाच्या नेत्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court+) १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत निकाल दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने या विषयाच्या अभ्यासासाठी न्यायमूर्ती बदर समिती नेमली. समितीने १६ मार्च २०२६ रोजी अहवाल शासनाकडे सोपवला. दोन ते अडीच महिन्यांत यावर अंतिम निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै मधील पावसाळी अधिवेशनात दिले होते. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही शासनाने अहवाल स्वीकारला नाही की त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
या दिरंगाईविरोधात मातंग समाजाने राज्यभरात ७२ मोर्चे काढूनही राज्य प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने अखेर समाजाने २९ सप्टेंबर रोजी थेट मुंबईत आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढ्यासाठी सर्वपक्षीय मातंग नेते एकत्र आले असून माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, रमेश बागवे, दिलीप कांबळे, माजी आमदार नामदेव सासणे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर तसेच विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. आझाद मैदानावर येणाऱ्या मातंग आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, रेल्वे प्रशासन आणि शासकीय रुग्णालयांना आवश्यक त्या नागरी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याबाबत सकल मातंग समाज समन्वय समितीने पत्र दिले आहे.




