सिन्नर | वार्ताहर Sinnar
शहरातील बसस्थानक परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला सिन्नर पोलिसांनी आज (दि. 24) अटक करून त्याची शहरातून धिंड काढली. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.
आकाश देविदास गोळेसर (26) रा. भोईगल्ली, गावठाण, सिन्नर याने मंगळवारी (दि.23) दुपारी सुमारे 1.30 वाजेच्या सुमारास सिन्नर बसस्थानक व परिसरात दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केली. यावेळी त्याने नागरिकांना धमकावून भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच सिटी लिंक बसच्या चालकाला दुखापत करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ व दमदाटी केल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांशीही हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत चंद्रभान सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपीकडून 500 रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. या कोयत्याला लाकडी मूठ असून एका बाजूला धार व टोकदार अर्धगोलाकार पाते असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून शहरातील प्रमुख भागातून त्याची धिंड काढली.
सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात पोलिसांचा कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे व नवनाथ पवार यांच्या पथकाने केली.




