पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
वसतिगृहातील शिक्षकाकडून त्रास दिला जात असल्याने गेवराई तालुक्यातील 13 वर्षीय विद्यार्थ्याने पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. समर्थ खरात (वय 13, रा. कवडगाव, ता. गेवराई ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. वसतिगृहातील शिक्षक सुभाष घुगे हे समर्थला त्रास देत तसेच मारहाण करत असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, समर्थच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. समर्थ हा पाथर्डी येथील एम. एम. निर्हाळी विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता. तो 2024 पासून हिंद वसतिगृहात राहत होता. त्याचा लहान भाऊ साई हा देखील याच वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. मागील तीन महिन्यांपासून वसतिगृहातील शिक्षक घुगे हे त्रास देत असल्याचे समर्थने वडील आबासाहेब खरात यांना यापूर्वी सांगितले होते. शिक्षक मारहाण करत असल्याचे लहान भाऊ साई यानेही वडिलांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मुलाकडून तक्रार मिळाल्यानंतर आबासाहेब खरात यांनी सुमारे महिनाभरापूर्वी वसतिगृहात जाऊन घुगे यांची भेट घेतली होती. समर्थला त्रास का देता, अशी विचारणा त्यांनी केली असता, मुलाला कोणताही त्रास देत नसल्याचे शिक्षकांनी सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी लहान मुलगा साई याचे जेवणाचे ताट हरवले होते. त्यावरून मुलांना त्रास दिला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी पुन्हा वसतिगृहात जाऊन शिक्षकांची भेट घेतली. ताट मिळवून देण्याचे सांगत मुलांना त्रास देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली होती.
बुधवारी (दि. 21) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास समर्थने वडिलांना फोन करून पोट दुखत असून शौचास जायचे आहे आणि दवाखान्यात जायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी त्याने तीस रुपये पाठविण्याची विनंती केली. वडिलांनी त्याला पैसे पाठवून दिले. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास आबासाहेब खरात हे गेवराई येथे असताना लहान मुलगा साई याने फोन करून समर्थ वसतिगृहात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे सांगितले. वडिलांनी पाथर्डीकडे येताना शिक्षक घुगे यांच्याशी संपर्क साधला. समर्थला उपजिल्हा रुग्णालयात आणल्याचे शिक्षकांनी सांगितले. वडील रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी समर्थचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शिक्षकाकडून होणार्या कथित त्रासाला कंटाळून समर्थने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच समर्थचे वडील आणि नातेवाईक पाथर्डीत दाखल झाले. मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत त्यांनी पाथर्डी पोलिस ठाणे गाठले. संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नातेवाइकांनी प्रश्न उपस्थित केले.आबासाहेब खरात यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात शिक्षक घुगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. समर्थच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेवरूनही प्रश्न निर्माण झाले.
नातेवाइकांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार दिला. मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) शवविच्छेदन विभागात पाठविण्यात आला.या घटनेमुळे वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांशी होणारे वर्तन आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत. तपासातून घटनेमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.




