अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील डावपेच यामुळे ही निवडणूक आता केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिल्ह्यातील राजकीय ताकद कोणाची, हे दाखवून देणारी प्रतिष्ठेची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, बँकेच्या 21 संचालकांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित जागांवर चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बुधवारी माघारीच्या गोंधळात आणखी दोन सोसायटी मतदारसंघ बिनविरोध झालेले असून यात श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे तर जामखेडमधून सभापती राम शिंदे समर्थक सचिन घुमरे यांचा समावेश आहे. याबाबत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने गुरूवारी सकाळी देण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आहे ती विखे, थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांच्या राजकीय भूमिकांची. जिल्ह्यात विखे यांना लंके यांनी एकाकी विरोध केला असून त्यांना अप्रत्यक्ष भाजपच्या राम शिंदे यांचा पाठींबा असल्याची चर्चा आहे. यामुळे बँकेच्या निवडणुकीत कोण कोणाला पदडाआड कशी मदत करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील संबंध, सहकारी संस्थांमधील प्रभाव आणि उमेदवारांची वैयक्तिक ताकद यामुळे काही मतदारसंघांत वेगळी समीकरणे तयार होऊ शकतात. बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपमधील एका गटाची काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक, तर दुसर्या गटाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जुळलेली राजकीय समीकरणे, यामुळे पक्षीय निष्ठेपेक्षा स्थानिक हितसंबंध अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसते. हीच बाब जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अधिक गुंतागुंतीची बनवते. वरच्या पातळीवर विरोधक असलेले नेते सहकाराच्या राजकारणात एकत्र येऊ शकतात, तर एकाच पक्षातील नेते वेगवेगळ्या आघाड्यांवर दिसू शकतात. त्यामुळे या निवडणुकीतील युती-आघाड्यांचा अर्थ केवळ पक्षीय राजकारणातून लावता येणार नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण किती जागा जिंकतो, यावरून केवळ संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट होणार नाही, तर जिल्ह्यातील राजकीय शक्ति संतुलनाचाही अंदाज येईल. विखे-थोरात यांची एकत्रित रणनीती किती प्रभावी ठरते, राम शिंदे यांचा स्वतंत्र प्रभाव किती आहे आणि लंके यांना किती पाठबळ मिळते, याची उत्तरे निकालातून मिळतील. सध्या दावे-प्रतिदावे आणि राजकीय समीकरणांची चर्चा रंगत असली, तरी अंतिम निर्णय सभासद मतदारच घेणार आहेत. त्यामुळे विखे-थोरातांची खेळी यशस्वी ठरते की लंके गट राजकीय आव्हान उभे करतो, हे 3 नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकाराच्या राजकारणातील प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई म्हणूनच चर्चेत राहणार आहे. दरम्यान, उमेदवारांना चिन्ह वाटपाच्या वेळी खा. नीलेश लंके आणि माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी आक्षेप घेतले असून माघारीच्या मुदतीनंतर प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान, प्रत्येक मतदान केद्रांत आणि मतदान पेट्यांच्या वाहतुकीचे चित्रिकरण करावे, अशी मागणी यावेळी खा. लंके आणि वाकचौरे यांनी केली.
राखीवमध्ये निघणार राजकीय कस
अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघात वैभव पिचड आणि प्रशांत लोखंडे यांच्यात लढत आहे. इतर मागासवर्गीय मतदारसंघात शिवदास गुंजाळ, कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, कडुचंद शेटे आणि आजिनाथ हजारे असे पाच उमेदवार मैदानात आहेत. विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघात सुभाष गिते, ऋषिकेश ढाकणे आणि गणपतराव सांगळे यांच्यात सामना होणार आहे. या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची वैयक्तिक ताकद, मतदारांशी असलेले संबंध आणि पडद्यामागील राजकीय पाठबळ यांचा कस लागणार आहे.
बँकेच्या कारभाराचे भविष्य ठरणार
राजकीय प्रतिष्ठेच्या या लढाईत जिल्हा बँकेच्या आर्थिक कारभाराकडे दुर्लक्ष होता कामा नये. शेतकरी, सहकारी संस्था आणि ठेवीदारांसाठी जिल्हा बँकेचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणाचा विजय होतो, याबरोबरच बँकेचा कारभार अधिक पारदर्शक कसा होईल, कर्जवाटप आणि वसुलीची प्रक्रिया अधिक प्रभावी कशी बनेल, यावरही चर्चा होणे आवश्यक आहे. संचालकपदासाठी नेत्यांमध्ये चुरस असताना शेतकर्यांच्या कर्जप्रश्नांवर, सहकारी संस्थांच्या आर्थिक स्थितीवर आणि ठेवीदारांच्या हितावर ठोस भूमिका मांडली जाते का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
अशा रंगणार लढती
सोसायटी मतदार संघ अकोले – आ. डॉ. किरण लहामटे व संजीवनी शिंदे, कर्जत तुषार पिसाळ व ज्योती शिंदे, पारनेर खा. नीलेश लंके व राहुल शिंदे, राहुरी आ. प्राजक्त तनपुरे व सत्यजित कदम. शेतीपूरक मतदार संघ आ. आशुतोष काळे व सुधीर म्हस्के. महिला राखीव (दोन जागा) मतदार संघ हर्षदा काकडे, पुष्पा गायकवाड, मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे व संगीता वाघ. अनुसूचित जाती जमाती मतदार संघ माजी आमदार वैभव पिचड व प्रशांत लोखंडे. इतर मागासर्व ओबीसी मतदार संघ शिवदास गुंजाळ, कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, कडूचंद शेटे व आजिनाथ हजारे. भटके विमुक्त मतदार संघ सुभाष गिते, ऋषिकेश ढाकणे व गणपतराव सांगळे.
कपबशी, छत्री अन् शिट्टीची लढाई
या निवडणुकीत पालकमंत्री विखे पाटील व माजी मंत्री थोरात यांच्या सहकार विकास पॅनेल असून त्यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. खा. नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे सहकार परिवर्तन पॅनेल असून त्यांना छत्री चिन्ह मिळाले आहे. तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही तिसरे स्वतंत्र पॅनेल केले असून, त्याला शिट्टी चिन्ह मिळाले आहे. शिंदे यांच्या पॅनेलचा एक उमेदवार बिनविरोध झाला असून त्यांचे आता तीन उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रमुख तीन नेत्यांचे तीन लंगडे पॅनल झाले आहे. दरम्यान, अकोले व कर्जत सोसायटी मतदारसंघातील लढतीमध्ये निवडणूक रिंगणातील चारही उमेदवार स्व बळावर लढत आहेत. त्या दोन्ही जागांसाठी सहकार विकास व सहकार परिवर्तन पॅनेलला उमेदवार देता आला आले नाही. त्यांचे समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. जिल्हा सहकारी बँकेचे सुमारे साडेतीन हजारावर सभासद प्रतिनिधी मतदार आहेत.
सभापती शिंदे यांनी व्यक्त केली नाराजी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर पॅनल जाहीर करण्याची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवण्यात आली होती. आपण स्वतः दोन पावले मागे येऊनही अखेरपर्यंत आपल्या उमेदवारांचा पॅनलमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, याकडे लक्ष वेधत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना पॅनलमधून डावलण्यात आल्याची नाराजीची भावना व्यक्त केली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बोलावलेल्या प्रक्रियेत सभापती शिंदे सहभागी होते. पत्रकारांकडे आपली भूमिका स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, तालुका मतदारसंघातील प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवण्याचा व उर्वरित 7 जागांसाठी मी, विखे, थोरात व शंकरराव गडाख यांनी एकत्रित सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. नीलेश लंके यांचीही बिनविरोध निवडणूक करण्यास सहमती होती. उमेदवार जाहीर करण्याची जबाबदारी विखे यांच्यावर सोपवण्यात आली होती. परंतु दुसर्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ऐनवेळेपर्यंत संपर्क करूनही आपले दोन उमेदवार समाविष्ट करण्यात आले नाहीत. कर्जत व जामखेडची जागा माझ्याकडेच होती. याव्यतिरिक्त मी एक महिला, ओबीसी किंवा एनटी किंवा स्वीकृत अशा जागा मागितल्या. मात्र थोरात यांनी एनटीची जागा देता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे महिला व ओबीसी जागेसाठी मंजुषा गुंड व आदिनाथ हजारे यांचे अर्ज ठेवले. आपल्याला विचारतील, पॅनलमध्ये घेतले जाईल, असे वाटत होते. परंतु दोन्ही उमेदवारांचा समावेश झाला नाही, अशी नाराजी शिंदे यांनी व्यक्त केली.
अकोले, कर्जतमध्ये प्रतिष्ठेच्या लढती
अकोलेमध्ये डॉ. किरण लहामटे आणि संजीवनी शिंदे, कर्जतमध्ये तुषार पिसाळ आणि ज्योती शिंदे, तर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे आणि सत्यजित कदम यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघांतील निकाल केवळ संबंधित उमेदवारांचे भवितव्य ठरवणार नाहीत, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय गटांच्या प्रभावाचाही अंदाज देतील.
महिला मतदारसंघात राजकीय परीक्षा
महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी हर्षदा काकडे, पुष्पा गायकवाड, मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे आणि संगीता वाघ यांच्यात चुरस आहे. सात उमेदवारांमधून दोन संचालक निवडले जाणार असल्याने या मतदारसंघात मतांची विभागणी निर्णायक ठरू शकते.
आ. काळे विरोधात म्हस्के
शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघात आ. आशुतोष काळे आणि सुधीर म्हस्के यांच्यात सामना आहे. सहकारी बँकेच्या राजकारणात अशा मतदारसंघांचे महत्त्व मोठे असते. कारण येथे वैयक्तिक संपर्काबरोबरच संस्थात्मक संबंध आणि स्थानिक सहकार क्षेत्रातील प्रभावही महत्त्वाचा ठरू शकतो. आ. काळे यांच्यासमोर म्हस्के तुल्यबळ नसले तरी आ. काळे यांना निवडणुकीत लढत द्यावी लागणार आहे.
लंके आणि शिंदे यांच्यातील लढतीकडे विशेष लक्ष
पारनेर मतदारसंघातील निलेश लंके आणि राहुल शिंदे यांच्यातील लढतीकडे विशेष लक्ष असेल. लंके यांच्यासाठी ही निवडणूक केवळ एका जागेची लढाई नसून, सहकार क्षेत्रातील स्वतःचा प्रभाव सिद्ध करण्याची संधी आहे. पारनेरमध्ये स्थानिक नेतृत्व, मतदारांशी असलेला संपर्क आणि सहकारी संस्थांमधील समीकरणे निर्णायक ठरू शकतात. लंके यांना अपेक्षित पाठबळ मिळाले, तर त्यांच्या राजकीय भूमिकेला बळ मिळेल. उलट निकाल लागल्यास त्यांच्या गटाच्या ताकदीबाबत नव्याने चर्चा सुरू होऊ शकते.




