Sunday, October 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : जिद्द अन् संघर्षाचा कोल्हापूर पॅटर्न!

राज-का-रण : जिद्द अन् संघर्षाचा कोल्हापूर पॅटर्न!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

आज राजकारणात बर्‍याचदा तडजोड हीच सोपी वाट समजली जात असली तरी संघर्ष हाच अंतिम सत्याचा मार्ग असतो, हे विसरले जात आहे. जर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक मतदारसंघात अशी जिद्दीची आणि धडाडीची काही माणसे उभी राहिली, तर पुढील काही वर्षांत महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलून जाऊ शकते. सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात जो करिष्मा दाखवला, तो केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही. तो एका विचारसरणीचा आणि जनमानसावरील पकडीचा विजय आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची आणि जिद्दीची परंपरा नवी नाही. जेव्हा-जेव्हा सत्तेचा माज आणि यंत्रणेच्या बळाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केला गेला, तेव्हा-तेव्हा मातीतून काही लढाऊ नेत्यांनी जन्म घेतला. अगदी वयाच्या चाळिशीत नव्हे तर ऐंशीच्या दशकातही पावसाच्या धारांमध्ये सभा गाजवत शरद पवार यांनी दाखवून दिलेली जिद्द असो किंवा प्रवाहाविरुद्ध जाऊन बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली लढाऊ संस्कृती असो, हे दाखवून देते की राजकारणात संख्याबळ आणि पैशांपेक्षा ‘जिद्दीचे राजकारण’ नेहमीच वरचढ ठरते. कोल्हापूर सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत किंवा एकूणच सहकार आणि राजकारणाच्या पटलावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दाखवून दिलेली ही अशीच जिद्द आणि राजकीय धडाडी आजच्या राजकारणात एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू शकते.

सतेज पाटील यांनी तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार तसेच साक्षात मुख्यमंत्री अशा बलदंड महाशक्तीशी लढा देऊन निसटते का होईना पण बहुमत मिळविले, ही केवळ साधारण घटना नाही. कितीही महाबली आले तरी जिद्द, धमक व हिंमत असेल तर यश मिळविता येऊ शकते याचा हा आणखी एक वस्तुपाठ म्हणून इतिहासात नोंदविला जाईल. राज्याच्या राजकारणात सगळ्याच संस्थांमध्ये सध्या सत्तारूढ महायुतीचे पारडे जड असताना, सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय आणि सर्वसंघटनात्मक शक्ती सत्तारूढ युतीकडे झुकलेली असतानाही राजू शेट्टी व सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर एकहाती लढा देत केवळ आपला पक्ष व गट टिकवला नाही, तर अत्यंत पॉवरफुल सत्ताही खेचून आणली.

सध्या देशात आणि राज्यात भाजपविरोधी वातावरण हवे तसे आक्रमकपणे उभे राहताना दिसत नाही. अनेकांचा असा दावा असतो की, विरोधकांमध्ये ताकद उरलेली नाही किंवा प्रत्येक जण सत्तेच्या समीकरणांनुसार जुळवून घेत आहे. अशा वातावरणात जिथे विरोधकांचे पाय रोखून उभे राहणारे नेतेही दिसेनासे झाले आहेत, तिथे सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या मातीत एक नवा आदर्श घालून दिला. या संघर्षाची तुलना राष्ट्रीय पातळीवरील लढ्याशीही करता येईल. ज्याप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी सर्व दबावांना बाजूला सारून एकाकी आणि जिद्दीने हा देशव्यापी लढा लढत आहेत, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सतेज पाटील यांनी प्रतिकूलतेशी दोन हात करत ‘भले भलेही चीत होऊ शकतात’ हा संदेश दिला. राजकारणात संख्याबळ महत्त्वाचे असतेच; परंतु त्याहून अधिक महत्त्वाची असते ती मनोस्वास्थ्याची आणि जिद्दीची तयारी. सतेज पाटील यांचा हा विजय पराभूत मानसिकतेने ग्रासलेल्या अनेक नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरला आहे.

राजकारणात अनेकदा लहान वाटणार्‍या घटना किंवा वेळेवर घेतलेले निर्णय संपूर्ण प्रवासाचा प्रवाह बदलून टाकतात. मध्यंतरी बुलडाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी केवळ राहुल गांधी यांनी केलेल्या एका फोनमुळे टळला होता. ही घटना वरकरणी किरकोळ वाटू शकते; परंतु अशा प्रत्येक घटनेतून एक वस्तुपाठ मिळतो, जर नेतृत्वाने योग्य वेळी योग्य पावले उचलली आणि लढण्याची तयारी ठेवली, तर पक्षाची पडझड रोखता येऊ शकते. कदाचित काहींना यातही आता खूप उशीर झाला असे वाटू शकते. राहुल गांधी यांचा सध्याचा लढा सर्वांनाच भावतो, हे खरे असले तरी त्यांनीही सुरुवातीची काही वर्षे वाया घालवली, हे नाकारता येणार नाही. तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी भर पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने पक्षाच्या धोरणाचा मसुदा फाडून भिरकावला तेव्हापासूनच त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला होता.

सुरुवातीलाच त्यांची गंभीर राजकारणी ही प्रतिमा पुढे आली असती तर आज देशातही वेगळे चित्र दिसले असते. राहुल गांधी यांची पप्पू ही प्रतिमा तयार करून भाजपने आपला दिल्लीचा मार्ग सुकर केला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही. आजही राहुल गांधी यांच्या या प्रतिमेचा त्यांच्या विद्यमान गंभीर, प्रामाणिक, न्यायासाठी लढू पाहणारा या प्रतिमेशी संघर्ष चालू असलेला दिसतो. त्यामुळेच काँग्रेसला आता अंधुकशी का होईना पण आशा वाटत असली तरी त्यासाठी वर्तनसातत्य ठेवावे लागेल. सध्या ज्यारीतीने देशव्यापी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम राहुल गांधी घेत आहेत, आक्रमक आंदोलने करीत आहेत, त्यात शैथिल्य आणता कामा नये. मोठ्या मुश्किलीने विद्यार्थी वर्ग त्यांच्यावर विश्वास टाकायला लागल्याचे दिसते. त्यांना फॉलो करताना तरुणाई उत्साही वाटते आहे. हे वातावरण टिकविण्यासाठी सातत्याची गरज तर आहेच; परंतु कार्यक्रमाची ही सफाई खालपर्यंत झिरपायला हवी. कोल्हापूरला सतेज पाटील यांनी ती तशी झिरपवून दाखविली, यासाठी त्यांच्या विजयाचे कौतुक आहे. केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर सर्वच विरोधी पक्षांच्या गल्लोगल्लीच्या पुढार्‍यांनी हा लढा लक्षात ठेवून काम करायला हवे.

आज राजकारणात बर्‍याचदा तडजोड हीच सोपी वाट समजली जात असली तरी संघर्ष हाच अंतिम सत्याचा मार्ग असतो, हे विसरले जात आहे. जर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक मतदारसंघात अशी जिद्दीची आणि धडाडीची काही माणसे उभी राहिली, तर पुढील काही वर्षांत महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलून जाऊ शकते. सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात जो करिष्मा दाखवला, तो केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही. तो एका विचारसरणीचा आणि जनमानसावरील पकडीचा विजय आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका अशा सगळ्याच संस्थांमध्ये लागोपाठ पराभव पदरी येऊन अपयशाचा इजा, बिजा, तिजा होऊनही साडेचार हजार कोटींची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाची सत्ता मिळविण्यात सतेज पाटील, राजू शेट्टी ही मंडळी यश मिळवितात तेव्हा तो जिद्दीच्या लढाईचा राजमार्ग बनतो. जेव्हा संपूर्ण यंत्रणा आणि सत्ताधारी पक्ष एकाच बाजूने ताकद लावत असतात, तेव्हा त्याविरुद्ध उभे राहणे आणि काठावर का होईना विजय मिळवणे ही साधी गोष्ट नाही.

यामुळे विरोधकांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा विजय केवळ एका सहकारी संस्थेपुरता सीमित नसून, तो आगामी निवडणुकांसाठी एक ‘मास्टरप्लॅन’ ठरू शकतो. सतेज पाटील यांनी दाखवून दिले की, जर संघटन भक्कम असेल आणि नेतृत्वात धडाडी असेल, तर पैशाची आणि सत्तेची मस्तीही जिरवता येऊ शकते. कोल्हापूरच्या या संघर्षाने आणि विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. सतेज पाटील यांनी राजकारणातील ‘अजेय’ असण्याच्या समजुतीला सुरुंग लावला आहे. जर विरोधकांनी असाच लढाऊ बाणा कायम ठेवला, तर आगामी काळात राज्याचे राजकारण अधिक चुरशीचे आणि रंजक होईल. जिद्द असेल तर अशय काहीच नाही हाच संदेश या संपूर्ण राजकीय घडामोडीतून नवीन पिढीला आणि राजकीय कार्यकर्त्यांना मिळतो.

जिद्दीचा असाही वस्तुपाठ
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जिद्द’ हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर येतात ते ज्येष्ठ नेते शरद पवार. वयाची ऐंशी पार केल्यानंतर, पक्षात पडलेली फूट, अनेक सहकारी सोडून गेलेले असताना आणि एका बाजूला अफाट राजकीय सत्ता व यंत्रणा उभी ठाकलेली असतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मैदानात उतरून महाराष्ट्र पिंजून काढला, त्याला तोड नाही. सातार्‍यातील पावसातील त्यांची ती सभा असो किंवा प्रत्येक मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये पेटवलेला आत्मविश्वास असो, लढल्याशिवाय हार मानणार नाही, या वृत्तीचे शरद पवार हे जिवंत प्रतीक आहेत. सत्तेच्या विरोधात कसे पाय रोवून उभे राहायचे आणि पडलेल्या घरातून पुन्हा पक्ष कसा उभा करायचा, याचा हा आधुनिक काळातील सर्वात मोठा वस्तुपाठ आहे. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणात आणि विरोधकांच्या तीव्र आव्हानांसमोर लातूरच्या मातीतून राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व निर्माण करणारे विलासराव देशमुख यांचे नावही जिद्दीच्या राजकारणासाठी आवर्जून घ्यावे लागेल. अनेकदा विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पक्षीय पातळीवरही त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागले; परंतु त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य आणि चिकाटी कधीही कमी झाली नाही. लातूर या आपल्या पारंपरिक मतदारसंघात त्यांना एकदा पराभवाची चवही चाखावी लागलेली आहे. तरीही परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, हसतमुखाने डाव कसा पलटवायचा आणि जनमानसातील पकड कशी कायम ठेवायची, याचे त्यांनी उत्तम उदाहरण घालून दिलेले असताना त्यांचेच काही सहकारी व चेलेदेखील जेव्हा फुटकळ स्वार्थासाठी पक्षत्याग करतात, तेव्हा तर अशा माणसांची आवर्जून आठवण होते.

मो. ९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

पाणी, चारा नियोजनाला प्राधान्य द्या – मंत्री छगन भुजबळ यांचे अधिकार्‍यांना...

0
येवला | प्रतिनिधी Yeola पावसाची तूट आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. पाणीटंचाईवर...