नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहजी यांचा नाशिक दौरा यावेळी वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून राजेंद्रजींना त्र्यंबक – नाशिकविषयी अपार प्रेम आहे. त्यामुळेच यापूर्वीही जेव्हा जेव्हा नाशिककरांनी त्यांना निमंत्रित केले तेव्हा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या नदी पुनरुज्जीवन व नदी संवर्धनाबाबतचा अनुभवाचा खजिना नाशिककरांसाठी रिता केला होता. यावेळेस सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांच्या माध्यमातून चालू असलेल्या विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून त्यांना महापालिकेने पाचारण केले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांचा उन्नत नाशिक हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सध्या सर्वच सरकारी यंत्रणांनी उचलून धरला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ या संकल्पनेचा एक भाग म्हणून नाशिक शहर स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी हे उन्नत नाशिक अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पंचवटीतील सदाशिव भोरे सभागृहात महापालिकेने हरित कुंभचा शुभारंभ सोहळा आयोजित केला होता. तत्पूर्वी त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथे उन्नत नाशिक अभियानांतर्गत काही कार्यक्रम झाले. त्र्यंबकेश्वरला तर गिरीश महाजन व राजेंद्र सिंहजी चक्क बसने प्रवास करून गेले. त्याचे कोण कौतुक समाज माध्यमातून केले गेले. येथपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण नंतर अचानक महाजन यांनी मुंबईकडे प्रस्थान ठेवले. मुख्यमंत्र्यांचे बोलावणे आल्याचे कारण त्यांनी दिल्याने त्यांचाही नाईलाज झाला असणार.
परंतु राजेंद्रजींना ही बाब खटकली. कारण ज्या भोरे सभागृहात मुख्य कार्यक्रम होता, तेथे तोपर्यंत टप्याटप्प्याने सभागृह रिते होत चालले होते. दुपारपासून या कार्यक्रमासाठी आणलेले पालिकेचे शिक्षकवृंद व कर्मचारी एव्हाना केवळ कंटाळले नव्हते तर बरोबर साडेपाचच्या ठेयाला जणू ड्युटी संपली समजून कार्यक्रमातून काढता पाय घेऊ लागले होते. एकतर महाजनांनी दांडी मारल्याने राजेंद्रजी अस्वस्थ तर झाले होतेच, पण त्यांचा भाषणाचा क्रम आला तेव्हा सभागृह जवळपास रिते झाले होते. साहजिकच, त्यांनी अवघ्या तीन मिनिटात आपले भाषण संपवून वेगळ्या अर्थाने आयोजकांचा निषेध नोंदविला. अर्थात, स्वभावधर्मानुसार त्यांनी या तीन मिनिटांचेही सोने केले. गोदावरीतील काँक्रिटीकरणाचा मुद्दा घेऊन त्यांनी महापालिकेचे सर्वोच्च पदाधिकारी व अधिकार्यांच्या उपस्थितीतच तोंडसुख घेतले.
गोदावरीच्या पात्रात केले गेलेले काँक्रिटीकरण हे पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर ठेकेदार व राजकारण्यांचे खिसे भरण्यासाठी असल्याचे ठणकावून सांगितले. नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी नदी संस्कृती, सभ्यता आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे, यावर जोर दिला. खरे तर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत असल्याने नदी संस्कृती व सभ्यतेविषयी जागरुकता करताना सर्वांनाच सजग करता येईल, अशी त्यांची अटकळ असावी. नदी पुनरुज्जीवन व नदी संवर्धनासंदर्भात त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न नवे नाहीत. या कार्यामुळेच त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला आणि हा विषय आंतरराष्ट्रीय पटलावरही आला. अशा एका खर्या अर्थाने महान व्यक्तिमत्त्वाला बोलावताना संबंधित कार्यक्रमाचे इन्फ्रास्ट्रचर कसे असावे याची काळजी आयोजकांनी घेणे क्रमप्राप्त होती.
शासकीय कामाची पद्धत माहीत असलेले राजेंद्रजींचे नाशिकमधील शिष्य यांनी तरी ही खबरदारी घ्यायला हवी होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तपोवनातील वृक्षतोडीचा विषय आला तेव्हा शेकडो नव्हे तर हजारो पर्यावरण, वृक्षप्रेमी एकवटले होते. नंतरही अनेक दिवस कोणी ना कोणी तपोवनात जाऊन आपल्या पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रदर्शन करीत होते. ही सारी मंडळी राजेंद्रसिंहजींना ऐकायला का आली नसावी, असा प्रश्न राहून राहून मनात दाटून येत आहे. राजेंद्रसिंहजी हे कर्ते पर्यावरणप्रेमी आहेत. आधी केले मग सांगितले हा त्यांचा जीवनप्रवास आहे. त्याचमुळे अशा माणसाच्या तोंडून निघणारे पर्यावरण रक्षणाचे वेदपठण कानात साठवून घेण्यासाठी या सर्व पर्यावरणप्रेमींनी आवर्जून यायलाच हवे होते. दुर्दैवाने हा टिपिकल सरकारी कार्यक्रम झाला. पालिकेने एक कार्यक्रम उरकला या भावनेपलीकडे फार काही केलेले नसावे.
तपोवनातील वृक्षतोडीवरून लक्ष्य ठरलेले व त्यातूनच ही उन्नत नाशिकची संकल्पना सुचलेले पालक व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनीही या कार्यक्रमाला दांडी मारून या विषयातील आपली गती स्पष्ट केली. जे झाले ते अत्यंत चुकीचे होते, हे सर्वांनीच मान्य करायला हवे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माणसाला बोलवायचे आणि त्याचे मनन, चिंतन ऐकायला समोर पाचपन्नास लोकांनीही थांबायचे नाही, हे योग्य नाही. यामुळे राजेंद्रसिंहजी यांचे काहीच नुकसान झालेले नाही. अशा नकारात्मक गोष्टींना ते केव्हाच पुरून उरले आहे. प्रश्न नाशिककरांचा आहे. आजकाल, नाशिककरांना कशाचेच काही सोयरसुतक राहिलेले नाही. अनंत समस्यांचा सामना करीत जीवन कंठणेही ते अत्यंत आनंदाने स्वीकारत आहेत. समाज माध्यमावरील रील्स म्हणजेच आभासी माध्यमातून अधूनमधून ते संताप जरूर व्यक्त करतात. तेवढेच मनाचे समाधान. अशा परिस्थितीत राजेंद्रसिंहजी असोत अन्यथा दुसरा कोणी नाशिककरांना काय फरक पडणार आहे?




