Friday, November 20, 2026
HomeनगरAhilyanagar : विमान कंपनीचा मालक सिंग अमेरिकेला जाण्याच्या तयारीत

Ahilyanagar : विमान कंपनीचा मालक सिंग अमेरिकेला जाण्याच्या तयारीत

अजितदादाप्रकरणात रोहित पवारांचा आणखी एक खळबळजनक दावा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्या अपघातावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. यावरून भाजपने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. व्हिएसआर कंपनीचे सिंग अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सिंग यांनी पाच विमाने अमेरिकेत ट्रान्सफर केली आहेत, असा धक्कादायक दावा यावेळी आ. पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या नव्या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

- Advertisement -

आ. पवार गुरूवारी नगरला आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आ. पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कोतकर परिवाराचे सांत्वन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते माध्यमांशी बोलत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांचा अपघात झालेल्या संबंधित विमान कंपनीला मफलरवाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता व हा मफलरवाला मुख्यमंत्री फडणवीस असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यावरून अजितदादांच्या अपघाताशी फडणवीस यांचा संबंध असल्याचा आरोप आ. पवारांनी केल्याचा दावा करून विरोधकांनी आ. पवारांवर टीका केली होती. त्याचे स्पष्टीकरण देताना गुरूवारी नगरमध्ये अजितदादांच्या अपघाताशी फडणवीस यांचा संबंध नाही, असे आ. पवारांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधकांवर टीका करताना, तुमच्या नेत्यांना वाचविण्यासाठी माझे पुतळे जाळले, माझ्यावर टीका केली. तुमच्या नेत्यांना खूष करण्यासाठी हे सगळे करत आहात, मी तुम्हाला माफ करतो, असेही स्पष्ट केले.

अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बुधवारी संध्याकाळी पत्र लिहून काही शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. पत्रातील प्रश्नांवर अमित शाह यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आले असून ते आगामी काळात सादर करणार आहे.

दरम्यान, अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी एका पुतण्याच्या भूमिकेतून प्रयत्न सुरू आहेत. अजितदादांच्या प्रकरणात केलेले प्रेझेंटेशन हे राजकीय नसून अराजकीय दृष्टिकोनातून केलं आहे. मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या प्रमुख म्हणून भूमिका मांडली, पवार कुटुंबातील सदस्य म्हणून विचारल्यास त्यांचा पाठिंबा राहील. अजितदादांना न्याय मिळावा, यासाठी नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार नीलेश लंके यांच्यासह ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानतो, असंही यावेळी आ. पवार यांनी म्हटलं आहे. राजकारण आज नाही तर उद्या करता येईल, मात्र अजितदादांना न्याय मिळणे महत्त्वाचे, असंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊस दरप्रश्नी समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तातडीने लोकप्रिय निर्णय घेण्यापेक्षा बँकेची आर्थिक परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या योजना अधिक...