मुंबई | वृत्त्संसंस्था
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक (क्लार्क) पदासाठी १६ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन चाचणी तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
१६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या या ऑनलाइन परीक्षेदरम्यान अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. सर्व्हर डाऊन होणे, कीबोर्ड व्यवस्थित काम न करणे तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. छत्रपती संभाजीनगर, कल्याण, वाशिम, हिंगोली यासह राज्यातील विविध ठिकाणी उमेदवारांना या समस्यांना सामोरे जावे लागले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी विविध ठिकाणी आंदोलन करत परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींविरोधात आवाज उठवला होता. छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी आंदोलक उमेदवारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
अखेर उमेदवारांच्या तक्रारी आणि परीक्षेदरम्यान झालेल्या तांत्रिक गोंधळाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने १६ ऑगस्टची ऑनलाइन टंकलेखन चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
या निर्णयामुळे तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.




