Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमालेगाव-कुसूंबा रस्त्यावर पुन्हा अपघाताचा बळी; ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

मालेगाव-कुसूंबा रस्त्यावर पुन्हा अपघाताचा बळी; ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

लेंडाणे येथील बारा वर्षीय शाळकरी मुलीच्या अपघाती मृत्यूला चोवीस तासही उलटत नाही तोच मालेगाव-कुसूंबा रस्त्याने पुन्हा टिंगरी येथील एका ७० वर्षीय वृध्देचा बळी घेतला आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कंटेरनने धडक दिल्याने जमीनीवर पडलेल्या ह्या वृध्दा कंटेनरच्या चाकाखाली येवून चिरडून गेल्याने जागीच ठार झाल्या. या महामार्गावर अवजह वाहनामुळे वृध्दा ठार झाल्याचे पाहताच संतप्त नागरीकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे उड्डाणपुलाखालील अवैध वाहनतळ व कुसूंबा-मालेगाव महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या अपघाताचे अधिक वृत्त असे की, शहरातील नवीन बसस्थानक परिसरात उड्डाण पुलाजवळ आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुजेचे साहित्य घेवून बस पकडण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या तालुक्यातील टिगरी येथील निर्मला शांताराम जाधव (७०) या वृध्देला भरधाव कंटेनरने धडक दिली. या धडकेने सदर वृध्दा रस्त्यावर पडून तिच्या अंगावरयून कंटेनरचे पुढचे चाक केल्याने ती चिरडली जावून जागीच ठार झाल्या.

शनिवारी सकाळी मालेगाव-कुसूंबा रस्त्यावर लेंडाणे गावाजवळ रस्ता ओलांडणार्‍या आरोही चव्हाण या शालेय विद्यार्थीनीचा भरधाव वेगात जाणार्‍या कारने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. या घटनेने कुसूंबारोडवरील अवजड व सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला होता. या घटनेमुळे लेंडाणेकरांनी रास्तारोको आंदोलन करीत महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाला धारेवर धरले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले होते. या घटनेला अवघे २४ तास उलटले नाही तोच नवीन बसस्थानकाजवळील उड्डाण पुलाखाली रस्ता ओलांडणार्‍या निर्मला जाधव या वृध्द महिलेस या भागातून वेगात जाणार्‍या के.ए.-५६-ए-०८०५ या कंटेनरने धडक दिली.

या अपघाताचे वृत्त परिसरात पसरताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी करीत काहीकाळ कुसूंबा रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. संतप्त नागरीकांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. घटनेदरम्यान पोलिसांनी तेथे धाव घेत जमावाची समजूत काढीत या भागातील अनधिकृत पार्किंग काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबविण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातल्यानंतरही या रस्त्याने सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. कुसूंबा ते मालेगाव दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या १५ ते २० खेड्यातील रहिवाशांसह शहरातील द्याने, कुसूंबारोड भागातील नागरीकांना जीव मुठीत धरून या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्याचे नुतनीकरण व रूंदीकरण झाल्यापासून परिसरात रस्ता अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत या रस्त्याने अनेक नागरीकांचा बळी घेतला आहे.

दरम्यान, संतप्त नागरीकांनी यावेळी या अपघातामागे उड्डाण पुलाखाली असलेल्या अनधिकृत पार्किंग हे एक मुख्य कारण असल्याचा आरोप केला. नवीन बसस्थानक परिसरात अनेक रिक्षा, चारचाकी वाहने या पुलाखाली अनधिकृतपणे लावली जातात. नागरीकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे निवेदन देवूनही हे अनधिकृत पार्किंग काढले जात नाही. तसेच अवजड वाहनांची वाहतूकही रोखली जात नाही. या अनधिकृत पार्किंगमुळे रस्त्याची रूंदी कमी होते वाहन चालकांची दृष्यता बाधीत होते आणि पादचार्‍यांना तेथून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. या अनधिकृत पार्किंगमुळेच अपघात होवून वृध्देचा बळी गेल्याचा आरोप संतप्त नागरीकांनी यावेळी केला.

कुसुंबा रस्त्याचे सुरक्षा परीक्षण केले जावे
मालेगाव ते कुसूंबा या सुमारे ३५ किलोमीटर रस्त्यावर अनेक घातक वळणे आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी चुकीच्या पध्दतीने रस्ता दुभाजक तयार केले आहेत. पथकर वसुली करणार्‍या एजन्सीकडून या रस्त्याची दुरूस्ती-देखभाल होत नाही. रस्त्यावर दिशादर्शक व अपघात प्रवण स्थळ दर्शविणारे फलकही अभावानेच आहेत. कोट्यवधी रूपयांचा खर्च करून तयार केलेल्या रस्त्याचे सेप्टी ऑडिट करणे गरजेचे आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांकडून ठेकेदाराची पाठराखण केली जात असल्याचा आरोप होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जनरलच्या चार जागांवर चौकार कोणाचा?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 14 तालुका सोसायटी मतदारसंघांमधील उमेदवारीचा तिढा जवळपास सुटल्याचे चित्र असले, तरी आता खरी राजकीय रंगत सर्वसाधारण (जनरल) मतदारसंघातील सात...