Tuesday, October 6, 2026
Homeक्राईमCrime News : आई-वडिलांकडून मुलाचा खून, मृतदेह शेतात नेऊन जाळला

Crime News : आई-वडिलांकडून मुलाचा खून, मृतदेह शेतात नेऊन जाळला

दारूच्या व्यसनावरून वाद || अहिल्यानगर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार न करता घरातच ठेवल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पहाटेच्या वेळी मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील शेतात नेऊन जाळून टाकल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील गुणवडी शिवारात रविवारी (4 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. प्रवीण प्रकाश लांडगे (वय अंदाजे 25) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील प्रकाश विनायक लांडगे आणि आई आशा विनायक लांडगे (रा. गुणवडी) यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी याबाबत माहिती दिली. प्रवीण मूकबधिर होता व त्याला दारूचे व्यसन होते. तो आई-वडिलांसोबतच राहत होता. त्याचे दारूच्या व्यसनावरून आई-वडिलांसोबत वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रवीण दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याचा आई-वडिलांसोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वडिलांनी दांडक्याने केलेल्या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला रूग्णालयात दाखल करून उपचार करण्याऐवजी घरातच ठेवण्यात आले. जखमी अवस्थेत असलेल्या प्रवीणचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. प्रवीणचा मृत्यू झाल्यानंतर आई-वडिलांनी याची माहिती कोणालाही न देता पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वत:च्या शेतात नेला. तेथे मृतदेह जाळून टाकण्यात आला. मृतदेह जाळल्यानंतर हाडे शिल्लक राहिली होती.

या घटनेची कुठलीही माहिती त्यांनी पोलिसांना किंवा इतरांना दिली नव्हती. दरम्यान, रविवारी सकाळी अहिल्यानगर तालुका पोलिसांना प्रकाश लांडगे याच्या शेतात मानवी शरीर जळाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्यासह उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार आबासाहेब झावरे, शरद वांढेकर, मंगेश खरमाळे, राहुल थोरात, विक्रांत भालसिंग आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जळालेल्या मानवी शरीराचे अवशेष आणि हाडे आढळून आली.

पोलिसांनी परिसराची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर जळालेला मृतदेह प्रवीण लांडगे याचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रवीणच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे घटनेबाबत सखोल चौकशी सुरू आहे. त्यांनी प्रवीणचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे सहायक निरीक्षक वारूळे यांनी सांगितले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर ग्रामीणचे उपअधीक्षक शिरीष वमने यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिकार्‍यांना सूचना केल्या. गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...