Saturday, November 21, 2026
HomeनगरAhilyanagar : जनरलच्या चार जागांवर चौकार कोणाचा?

Ahilyanagar : जनरलच्या चार जागांवर चौकार कोणाचा?

सात जागांच्या वाटपावरून राजकीय फायनल बाकी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 14 तालुका सोसायटी मतदारसंघांमधील उमेदवारीचा तिढा जवळपास सुटल्याचे चित्र असले, तरी आता खरी राजकीय रंगत सर्वसाधारण (जनरल) मतदारसंघातील सात जागांवर आली आहे. या सात जागांचे विखे-थोरात गटात सहमतीने वाटप कसे होणार आणि त्यातील चार जागांवर कोण चौकार मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सहकाराच्या राजकारणात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी याच सात जागा असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील सहकाराच्या राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जनरलच्या सात जागांपैकी चार जागांवर विखे गटाचा दावा असून, त्यातील एक जागा सभापती राम शिंदे यांच्यासाठी राखून ठेवण्याची मागणी असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे थोरात गटही जनरल मतदारसंघातील चार जागांवर ठाम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या दाव्यांमध्ये नेमकी तडजोड कशी होणार, हा कळीचा प्रश्न बनला आहे. तालुका सोसायटी मतदारसंघात प्रत्येक नेत्याच्या राजकीय ताकदीनुसार जागांचे नियोजन करून बिनविरोधचा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जनरलच्या सात जागांवर अंतिम तोडगा निघाल्याशिवाय संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचे गणित जुळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सात जागांवर सहमती झाली नाही तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष लढत होण्याची शक्यता आहे.

..तर सहमतीने निवडणुकीची रणधुमाळी
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला असला, तरी सात जनरल जागांचे वाटप हा अंतिम अडसर ठरत आहे. विखे-थोरात गटांमध्ये या जागांवर सहमती झाली तर बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळा होणार आहे. मात्र, जागावाटपाचा तिढा कायम राहिला तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सहमतीच्या राजकारणाला अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जनरलच्या सात जागांवर होणारा फैसला जिल्हा बँकेच्या संपूर्ण निवडणुकीची दिशा ठरविणारा ठरणार आहे.

अकोलेत गायकर-पिचड-लहामटेंमध्ये लॉटरी कोणाची ?
अकोले मतदारसंघातील राजकीय गणितही लक्षवेधी ठरणार आहे. ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, मधुकर पिचड आणि आमदार किरण लहामटे यांच्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पारनेर सोसायटी मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांच्यासाठी भाजपमधील एका गटाकडून आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे. श्रीरामपूरमध्ये ओबीसी आणि सोसायटी मतदारसंघाचे स्वतंत्र नियोजन सुरू असून, श्रीगोंद्याचा तिढा अद्याप कायम आहे. सभापती राम शिंदे जामखेडमधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट होत असताना कर्जतच्या जागेचे काय होणार, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. राहाता, राहुरी आणि शेवगावमध्ये युवा चेहर्‍यांना संधी मिळणार की अनुभवी ज्येष्ठांवरच विश्वास टाकला जाणार, याची उत्सुकता आहे. पाथर्डीत पुन्हा आमदार मोनिका राजळे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात असले, तरी त्यांच्याविरोधात कोणता डाव टाकला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगर तालुक्यात आमदार अक्षय कर्डिले यांच्याविरोधात बाळासाहेब हराळ मैदानात उतरणार की ऐनवेळी माघार घेणार, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महिला राखीवमध्ये उत्तर- दक्षिण ?
जनरलच्या सात जागांमध्ये बिगरशेती मतदारसंघासाठी नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ताकद लावल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह असल्याचे सांगितले जाते. या नावावरही सहमती घडवून आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. शेतीपूरक मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. महिला राखीव मतदारसंघात उत्तर नगर आणि दक्षिण नगर अशा दोन्ही भागांना प्रतिनिधित्व देण्याचे नियोजन असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे निलंबित;...

0
मुंबई | Mumbai राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे (Ramdas Gade) यांना राज्य...