Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुलाच्या अर्धवट कामामुळे बालकाचा बळी; संतप्त नागरिकांचे पुलावर ठिय्या आंदोलन

पुलाच्या अर्धवट कामामुळे बालकाचा बळी; संतप्त नागरिकांचे पुलावर ठिय्या आंदोलन

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

मोसम नदीवरील नुमानी पुलास संरक्षण कठडे नसल्याने चार दिवसापुर्वी पुलावरून जात असलेला सातवर्षीय बालक मोसमच्या पुरात वाहून गेला. पुलास संरक्षक कठडे लावले नाहीत तसेच नवीन पुलाचे काम देखील अर्धवट सोडण्यात आल्यानेच बालकाचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या किल्ला, नुमानीनगर आदी भागातील महिला व नागरीकांनी मोसम पुलावर ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी नागरीकांनी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडत आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, मोसम नदीवरील पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामावरून आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दीक वाद रंगला आहे. तर या पुलाचे काम तातडीने सुरू न झाल्यास महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलनास प्रारंभ करण्याचा इशारा परिसरातील नागरीकांनी दिला आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे हरणबारी धरणातून हजारो क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मोसम नदीस यंदा प्रथमच मोठा पुर आला होता. पाच दिवसापुर्वी शहरातील हयात मशिदीलगत राहणारा मोहंमद एतेशाम मोहंमद अब्दुल्ला (७) हा बालक नुमानी पुलावरून पायी जात असतांना अकस्मात पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. पुलास संरक्षक कठडे नसल्याने या बालकास बचावाची कुठलीही संधी मिळाली नाही.

पुरात बेपत्ता झालेल्या एतेशामचा मनपा अग्निशमन विभाग जवानांसह किल्ला तैराक ग्रुपच्या तरूणांतर्फे सातत्याने शोध घेतला जात होता. मात्र पुराच्या पाण्याची पातळी अधिक असल्याने या शोध कार्यास अडथळे येत होते. काल मधुरपाडे गावालगत गिरणा धरणाच्या बॅक वॉटरलगत मासेमारी करणार्‍या रोहिदास माळी यास बालकाचा मृतदेह तरंगतांना दिसल्याने त्यांनी याची माहिती अग्निशमन दलाचे शकील तैराक यांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन कि.मी. अंतर पाण्यात जावून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. हा मृत मुलगा मोहंमद एतेशाम असल्याचे दिसून आले.

मोसम नदीवरील नुमानी पुलाचे अर्धवट सोडण्यात आलेले काम तसेच लहान पुलास संरक्षक कठडे लावले नसल्यानेच बालकाचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या किल्ला, नुमानीनगर आदी भागातील महिला व नागरीकांनी नुमानी पुलावर जावून ठिय्या आंदोलन सुरू करत आपला संताप व्यक्त केला. पुलाचे उद्घाटन करून अनेक वर्षे उलटले तरी पुल बांधला जात नाही व लहान पुलास संरक्षक कठडेच लावले गेले नाही. यास लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी संतप्त नागरीकांनी केला. सात वर्षीय बालकाचा बळी प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच गेला असल्याने मृताच्या कुटूंबियांस आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी संतप्त महिलांनी केली.

नुमानीनगर पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन जल्लोषात करणार्‍यांनी नंतर या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. सात वर्षीय बालकाचा मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व दुखदायक आहे. मात्र गिरणा-मोसमनदी पात्रात पुर आल्यावर आपली मुले जाणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेणे गरजेचे आहे. पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत तातडीने माहिती घेत उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर व उपमहापौरांना आपण दिले आहेत.
आसिफ शेख रशीद, माजी आमदार

मोसम नदीच्या पुरात सातवर्षीय बालक वाहून गेल्याची घटना दु:खदायक आहे. अप्रिय घटना घडू नये यासाठीच आपण शासनाकडून निधी आणत पुलाचे काम सुरू केले होते. मात्र भुमीगत गटार योजनेचा पाईप व पुलाच्या स्लॅबवर असलेल्या ११ हजार केव्ही क्षमतेच्या तारांमुळे काम करण्यास ठेकेदारास अडथळा येत आहे. या संदर्भात मनपाकडे सातत्याने आपण मागणी करून देखील दुर्लक्ष केले गेले. याबरोबरच ठेकेदाराचे झालेल्या कामाचे बिल देखील मनपातर्फे दिले जात नाही. ठेकेदारास बिल दिल्यास व अडथळा ठरत असलेल्या तारा व पाईप काढल्यास हे काम तातडीने सुरू होवू शकणार आहे. मनपातर्फे कामास दिरंगाई होत आहे मात्र आमची जबाबदारी देखील झटकून चालणार नाही.
मौलाना मुफ्ती इस्माईल,आमदार, मालेगाव मध्य

पुलाच्या झालेल्या कामाचे बिल मिळत नसल्याने ठेकेदाराने गत अनेक महिन्यापासून हे काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे मोसम नदीवरील नुमानी पुल हा शहराच्या पुर्व व पश्चिम भागास जोडणारा आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे, महापौर नसरीन शेख, उपमहापौर शानेहिंद व आयुक्त रविंद्र जाधव यांनी बालकाच्या मृत्यूची गंभीरतेने दखल घेत हा पुल तातडीने बांधून पुर्ण करावा, अशी मागणी यावेळी नागरीकांतर्फे केली गेली.

ताज्या बातम्या