नाशिक / शैलेंद्र तनपुरे – दै. देशदूत – संपादक
बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी एक आव्हान देणारी उक्ती मराठी भाषेत आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना ती ठाऊक असण्याची शक्यता कमी. त्या हरियाणाच्या असल्याने कदाचित त्यांना मराठीतील म्हणी, उक्ती यासारखे भाषालंकार माहिती नसतील. त्यामुळेच परवा त्यांनी जेव्हा सिंहस्थाच्या कामात चूक दाखवा, टेंडरमध्ये काही गडबडी दाखवा, तसे झाल्यास मी माझे नाव बदलून टाकीन, असे आव्हान दिले. सिंहस्थ कामांची पाहणी करताना माध्यम प्रतिनिधींकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांना कंटाळून त्यांनी हे असे सडतोड उत्तर दिले. त्यातून त्यांचा प्रचंड आत्मविश्वास तर दिसलाच शिवाय होत असलेल्या कामांबाबतही त्यांचे पूर्ण समाधान दिसून आले. जी कामे सध्या शहरात चालू आहेत, त्याचा दर्जा, ती करणारी माणसं याबाबतही त्यातून एकप्रकारची ग्वाही डोकावली.
आयुक्त खत्री या डॅशिंग् आहेत, बिंधास्त काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण सध्या एकूणच शहराची जी काही अवस्था झाली आहे, ती अनुभवूनही त्या जर एवढ्या निश्चिंतपणे प्रश्नकर्त्यांनाच थेट आव्हान देत असतील तर मग चुकतेय कोण, नाशिककर, माध्यमे, तज्ज्ञ की प्रशासन? कारण सध्या शहरात सुरू असलेल्या या कामांची गती, नियोजन आणि गुणवत्ता यावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी आहे. खत्री बाईंच्या या आव्हानयुक्त इशार्यामुळेच त्यांना उपरोल्लेखित मराठी म्हणीची आठवण करून द्यावीशी वाटली. ही कामे दर्जेदार, उत्तम होत असतील किंवा नंतर ती तशी आहे हे कळणार असेल तर चांगलेच आहे. पण लोक सद्यस्थितीचा विचार करून व्यक्त होत असतात. त्यामुळे नाशिककरांना सध्या जे भोगावे लागते आहे, त्यातून त्यांची सुटका कधी व कशी करणार याचे उत्तर खरे तर बाईंनी आधी द्यावे. सध्या, विकासासाठी थोडा त्रास झाला तरी तो सहन करा, असे सगळेच सांगत सुटले आहेत. ठीक आहे. लोक सहन करीत आहेतच. पण किती दिवस याचे उत्तर त्यांना मिळायला हवे.
आजही अनेक रस्त्यांची कामे किती दिवस चालणार, ते कोण करीत आहेत, त्याचे टेंडर कितीचे वगैरे माहिती कोठेच दिसत नाही. साहजिकच लोक बोलणार. त्यामुळे अशा लोकांनाच आव्हान देण्यापेक्षा जी कामे चालली आहेत, त्यांची गती वाढवून तुमचा त्रास कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले असते तरी लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असता. त्यातच हल्ली प्रशासकीय अधिकार्यांमध्ये असे चित्रपटातील संवादासारखे आणि आव्हानात्मक स्टेटमेंट करण्याची जणू फॅशनच आली आहे. मध्यंतरी सिंहस्थ आयुक्तांनीही कामांचे सादरीकरण करताना असाच अफाट आत्मविश्वास दाखवला होता. वातानुकूलित दालनांमध्ये बसून, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या चकचकीत पडद्यावर आणि फाईल्समधील आकड्यांवरून शहराचे चित्र अत्यंत ‘आलबेल’ आणि परिपूर्ण असल्याचा भास अधिकार्यांना होत असावा. परंतु कागदावर दिसणारे हे चित्र आणि जमिनीवरील वास्तवात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
शहरातील रस्त्यांवर नजर टाकल्यास वास्तवाचे विदारक दर्शन घडते. नाशिककर सध्या खड्डे, कुठेही आणि कसेही खोदलेले रस्ते, धुळीचे साम्राज्य आणि अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यामुळे निर्माण झालेली वाहतूककोंडी यामुळे पुरते वैतागले आहेत. शहरात फिरताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कामे अत्यंत रडतखडत, संथ गतीने आणि नियोजनाचा पूर्ण अभाव ठेवून सुरू आहेत. सर्वात धक्कादायक आणि दुर्दैवी बाब म्हणजे, या ढिसाळ कारभारामुळे शहरात सातत्याने अपघात होत असून अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी ‘माझे नाव बदलेन’ अशी भाषा वापरतात, तेव्हा ते जनतेच्या रोजच्या जगण्यातील वेदनांची थट्टा उडवत असल्यासारखे वाटते. एका बाजूला नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांतून आणि धुळीतून मार्ग काढत असताना, प्रशासन मात्र ‘सर्व काही सुरळीत आहे’ असा दावा करून दिशाभूल का करत आहे? हा अधिकार्यांचा खरोखरच दांडगा आत्मविश्वास आहे की, जमिनीवरील वास्तवापासून पूर्णपणे तुटलेपणाचे लक्षण? अधिकारी जेव्हा कंत्राटदारांच्या कामाची शंभर टक्के हमी घेतात, तेव्हा यामागे कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा तर हेतू नाही ना, अशी रास्त शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होते.
सिंहस्थाची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे; तो जनतेवर केलेला उपकार नाही. लोकशाहीत प्रशासनाने जनतेच्या तक्रारींचे आणि सूचनांचे स्वागत करून कामात सुधारणा करणे अपेक्षित असते, त्यांना आव्हान देणे नव्हे. अधिकार्यांनी स्वतःची नावे बदलण्याची जनतेला अजिबात इच्छा नाही. त्यापेक्षा त्यांनी आपली कार्यपद्धती बदलावी, कंत्राटदारांवर वचक निर्माण करावा आणि शहराचे हे विदारक चित्र बदलून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा द्याव्यात, एवढीच सामान्य नाशिककरांची माफक अपेक्षा आहे. कागदी आणि शाब्दिक दाव्यांपेक्षा जमिनीवर दिसणारे कामच अधिकार्यांची खरी ओळख निर्माण करत असते, हे प्रशासनाने वेळीच ओळखायला हवे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या करारी स्वभावाला अनुसरून ही कामे निश्चितच चांगली होतील असा आशावाद तोपर्यंत जागवूया.




