पुणे | प्रतिनिधी Pune
सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी (दि. 10) ख्यातनाम हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वयाची शंभरी पार केलेल्या शि. द. फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे.

मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी फक्त साहित्यिकांची अथवा मराठी भाषिकांची नसून शासनाची देखील आहे. महायुतीच्या सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात आधीच्या सरकारने स्थापन केलेली समिती शासकीय होती की त्या राजकीय पक्षाची होती या विषयी विश्लेषण व्हायला हवे, अशी भूमिका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या व्यासपीठावर मांडली. आधुनिक जगाला सामोरे जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत होत असलेल्या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडत मराठी भाषा विभागाकडून एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही त्यांनी जाहीर केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते तर महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांची सन्मानीय उपस्थिती होती. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत मंचावर होते.
साहित्य संमेलनाच्या नियोजनातही मराठी भाषा विभाग सहभागी होईल, अशी ग्वाही देत उदय सामंत म्हणाले, मराठी भाषेची परंपरा आणि ठेवा जतन करण्यासाठी शालेय शिक्षणात साहित्यिकांवरील अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. तसेच इतर भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत अनुवादीत व्हावे याकरिता अनुवाद समिती स्थापन करण्याचे कार्य सुरू आहे. मराठी भाषेला परदेशातही मान मिळावा यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालसाहित्य, महिला आणि युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मानस आहे.
बोधचिन्हासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, हे बोधचिन्ह सरकारलाही बोध देणारे आहे. मराठी भाषेवर अन्याय होऊ नये आणि अन्याय करणाऱ्यांवर वार केला जावा हे या बोधचिन्हातून दर्शविले गेले आहे.




