Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हयात १४३१ बालकांचे कुपोषण कमी करण्यात यश

जिल्हयात १४३१ बालकांचे कुपोषण कमी करण्यात यश

नाशिक । प्रतिनिधी

एकीकडे 2020 सालापासून आपण करोनाशी झुंज देत असताना राज्यासह जिल्ह्यात परिस्थिती सुधारत आहे. अशातच जिल्ह्यात आदिवासी भागांसह काही तालुक्यांमध्ये आढळून येणारे कुपोषण काही प्रमाणात घटविण्यास जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाला यश आले आहे. हे जिल्ह्यातील आशादायी चित्र म्हणावे लागेल. मार्च 2020 च्या तुलनेत मार्च 2021 अखेरीस तब्बल 1,431 बालकांचे कुपोषण कमी करण्यात आले आहे. या काळात 438 गंभीर कुपोषित बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेची महिला व बालकल्याण समितीची सभा नुकतीच पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेताना काहीसे आशादायी चित्र प्रकटले. सध्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव देखील कमी होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील तब्बल 1,431 बालकांनी वर्षभरात कुपोषणाविरोधात यशस्वी लढा दिला आहे. मार्च 2020 मध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या 3,407 होती. ही संख्या यंदा 2,414 आली असून, वर्षभरात 993 मध्यम कुपोषित बालकांनी कुपोषणावर मात केली. तर तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या मार्च 2020 अखेरीस 810 होती, ही संख्या यंदा 372 नोंदविली गेली आहे.

यामध्ये महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोविड महामारीच्या काळात घरोघरी जाऊन हे कार्य केले आहे. यावेळी त्यांनी एखाद्या करोना योध्याप्रमाणे नियमित ताजा आहार, अमृत आहार, टीएचआर तसेच पोषणकल्पवडी आणि मायक्रोन्युट्रीएंट हा अतिरिक्त आहार लाभार्थ्यांना वाटप केल्यामुळे 1431 बालकांचे कुपोषण कमी करण्यात यश आले आहे.

करोनाच्या आव्हानात्मक काळातही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी घरोघरी जाऊन शासनाकडून पुरविला जाणारा पोषणआहार गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविल्याने हे कुपोषण घटू शकले आहे. आरोग्य विभागाकडून सातत्याने होणारी महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणीदेखील कुपोषण घटविण्यासाठी आधारभूत ठरली आहे.

अश्विनी आहेर, सभापती, जि. प.

- Advertisment -

ताज्या बातम्या