Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedFathers Day : माझ्या भवितव्यासाठी दादांचे छातीवर दगड ठेवून निर्णय

Fathers Day : माझ्या भवितव्यासाठी दादांचे छातीवर दगड ठेवून निर्णय

माझे वडील राजाराम खरात पूर्वीच्याकाळी आमच्या भेंडा गावात सालदारकीला बरे दिवस होते. तसे ते सर्वच गावात होते. सधन शेतकर्‍यांच्या घरी व शेतात चोवीस तास बारामहिने कामे केली जात. त्याच्या बदल्यात त्या सालदाराला 3 ते 5 हजार रुपये वर्षाकाठी मिळत. माझे वडिलांना मी दादा म्हणतो. दादांची आयुष्यातील सुरुवातीची 15 वर्षे तरी सालदारकीत गेली. दादा मुलांवर जीवापाड प्रेम करायचे. माझ्या आयुष्यात त्यांनी केवळ हात उगारला, मात्र कधीच अंगाला लावला नाही.

एक पोळ्याचा दिवस होता. आईने रेशनवरून गहू आणले होते. मी एक बोकाणा गहू तोंडात टाकले. मला भूक लागलेली होती. इतक्यात आईचे माझ्याकडे लक्ष गेले. तिने दादांना सांगितले पोरगं गहू खातंय पोट दुखेल त्याला पटकन ओढा. दादांनी मला पटकन अलगत उचलेले. पण माझी भुकेची भट्टी तीव्रतेने पेटत होती. दादांनी मला उचलल्यासरशी मी दादांच्या मनगटाला जोराचा चावा घेतला. चावा एवढा तीव्र होता की दोन्ही जबड्यांचे दात खोलवर रुतले होते. दादांचे हात रक्तबंबाळ झाले होते. दादांना खूप तीव्र वेदना झाल्या होत्या. परंतु दादांनी मला साधे बोट सुद्धा लावले नाही.

- Advertisement -

माझा वर्गामध्ये नेहमीच पहिल्या 3 मध्ये नंबर असायचा. शाळेची फी भरण्यासाठी एकदा पैसेच नसल्याने प्राचार्यांनी वडिलांना बोलावून घेतले. जेव्हा दादा व मी प्राचार्याचे कार्यालयात गेलो तेव्हा प्राचार्य दादांना म्हणाले, हे बघा, तुमच्या घरात हा मुलगा जन्माला आला म्हणजे कोळशाच्या खाणीत हिरा सापडला आहे. हे ऐकून दादांनी त्वरित पैशाची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. दादांचा एखाद्या शाळेत प्राचार्यांना भेटण्याचा हा पहिला आणि शेवटचाच दिवस होता.

मला बी.एस्सी अ‍ॅग्रीला प्रवेश मिळाला. आता होस्टेलमध्ये स्वतःचा छोटा संसार थाटायचा होता. अखेर आई-दादांनी ती कालवड बाजारात नेऊन विकली, त्या पैशांमधून मला होस्टेलला लागणारे साहित्य खरेदी केले. घरी आल्यानंतर मला अशी कुणकुण लागली की कालवड विकली. माझ्या जीवाची घालमेल झाली . रात्री आईला विचारले, तू कालवड का विकली? तिने माझी समजूत काढली. मात्र माझ्या मनाची मीच समजूत काढली.

घरात मुलांसारखे जपणारी जनावरे विकताना कोणताही शेतकरी समाधानी नसतो. तो बाजारातून मागे येताना उदास मनाने येत असतो. घरातील, अंगणालील एक प्राणी निघून गेल्याचे त्याच्या मनात काहूर माजत असतो तसा आई-दादांच्या मनात होत असावे. परंतु समोर मुलाचे भवितव्य घडवायचे होते . त्यामुळे छातीवर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागतात तसाच निर्णय माझ्या बापाने त्यावेळी घेतला आणि असे करत करतच माझे शिक्षण पूर्ण केले. सध्या मी बुलढाणा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी व जात पडताळणी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

-गुलाब राजाराम खरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी, बुलढाणा.

- Advertisment -

ताज्या बातम्या