Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशयुरोचा हिरो इंग्लंड की इटली फैसला आज

युरोचा हिरो इंग्लंड की इटली फैसला आज

नाशिक । प्रतिनिधी

16 व्या युरो स्पर्धेत आता केवळ या युरोचा हिरो कोण हा फैसला बाकी आहे. इंग्लंड आणि इटली यांनी आपले सर्व अडथळे करून स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी आपली सज्जता सिद्ध केली आहे. या दोन्हीही संघांची या स्पर्धेतील कामगिरी जवळ जवळ सारखीच आहे.

- Advertisement -

अ समावेश असलेल्या इटलीने आपल्या तीन साखळी सामन्यात तुर्कीला 3-0, स्वीझर्लंडला 3-0 आणि वेल्सला 1-0 असे पराभूत करून बाद फेरी गाठली होती. बाद फेरीच्या राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात इटलीने ऑस्ट्रीयाला 2-1 असे नमवले, तर उपउपांत्य सामन्यात विश्व स्तरावर पहिल्या क्रमांकावर असणार्‍या बलाढ्य बेल्जीयमला 2-1 असे पराभूत केले, आणि उपांत्य सामन्यात स्पेनला पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-2 असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.

इंग्लंडचा या स्पर्धेतही प्रवास आपल्या तीन साखळी सामन्यात क्रोएशिया आणि झेक प्रजासत्ताक या दोन संघांना 1-0 अश्या फरकाने पराभूत केले तर स्कॉटलंडविरुद्ध बरोबरी साधली. बाद फेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडने अतिशय आत्मविश्वासाने खेळ करून फुटबॉलमध्ये दबदबा असेलल्या जर्मनीला 2-0 असे पराभूत करण्याची किमया केली. तर उपउपांत्य फेरीत युक्रेनवर 4-0 असा मोठा विजय मिळविला. तर उपांत्य फेरीत धोकादायक डेन्मार्कला अतिरिक्त वेळेत 2-1 असे पराभूत करून अंतिम फेरीत तब्बल 55 वर्षांनी प्रवेश केला आहे.

इंग्लंडने 1966 च्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर त्यांना अशा मोठ्या स्पर्धामध्ये किमान अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर इटली विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या अंतिम सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दोन संघामध्ये याआधी 33 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये इटलीने 11 वेळा तर इंग्लंडने 8 वेळा विजय प्राप्त केला आहे. तर 14 सामने अनिर्णीत राहिले आहेत.

युरो स्पर्धेत या दोन संघादरम्यान दोन सामने खेळले गेले आहेत, या दोन्हीही सामन्यांत इटलीने विजय मिळवला आहे. इटलीचा फुटबॉलचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. इटलीने चार वेळा विश्वचषक मिळवला आहे. तर दोन वेळा उपविजेतपद मिळवले आहे. युरो स्पर्धेचे एक विजेतपद इटलीने आपल्या नावावर केले आहे.

इंग्लंडची कामगिरी बघता इंग्लंडने याआधी 1966 साली विश्वविजेतेपद मिळवले आहे. तर युरोमध्ये इंग्लंडला फारसे यश मिळालेले नाही. इटलीची विश्व फुटबॉलमध्ये अश्या प्रकारची मोलाची कामगिरी असूनही 2018 मध्ये रशियामध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी इटलीला पात्रता मिळवता आली नव्हती आणि इटलीला या विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागले होते. मात्र इटलीने ही बाब फारच मनावर घेतलेली आहे. कारण त्यानंतर ऑक्टोबर 2018 पासून गेल्या दोन -अडीच वर्षांत इटलीने 34 सामन्यांमध्ये एकही हार पत्करलेली नाही.

या स्पर्धेतील इंग्लंडची कामगिरी बघता इंग्लंडने आपल्या सहा सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर 10 गोल केले आहेत, तर मजबूत बचाव करून आपल्या पाच सामन्यात एकही गोल होवू दिला नव्हता. मात्र उपांत्य सामन्यात डेन्मार्कने केलेला एक गोल हा या स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धचा पहिला गोल ठरला आहे. इटलीचा या स्पर्धेतील खेळ बघता इटलीने आपल्या सहा सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर 12 गोल केले आहेत तर उपांत्य सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये चार गोल केले आहेत तर त्यांनी तीन गोल स्वीकारले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील या दोन्हीही संघांची कामगिरी बघता या अंतिम सामन्यात दोन्हीही संघांना सामान संधी आहे, असे दिसून येत आहे.

या स्पर्धेत इटलीच्या फेड्रिक चीएसा, निकोलो बार्देला, लॉरेंझो इंसिग्न, माँटेओ पिस्सीना, कैरो एकम्मेबिल यांनी गोल केले आहेत म्हणजे त्यांच्याकडे गोल करण्याची क्षमता असलेले बरेच खेळाडू आहेत. तर कर्णधार जॉर्जेनो चील्लेनी आणि लिओनार्डो बॉनुची यांची मजबूत बचाव फळी आहे, मार्को व्हेराट्टी, निकॉलो बॅरेला यांनी मध्यपंक्तीत चांगली कामगिरी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या