Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याघर क्रमांकाचा प्रकल्प अद्याप कागदावरच!

घर क्रमांकाचा प्रकल्प अद्याप कागदावरच!

नवीन नाशिक | निशिकांत पाटील | New Nashik

नाशिक महानगराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणार्‍या ‘सिडको’ (CIDCO) या गृहनिर्माण संस्थेने नाशिक शहरात (Nashik City) 6 गृहयोजना उभारल्या आहेत. या सर्व योजनांचे हस्तांतरण महापालिकेकडे (Nashik NMC) करण्यात आले…

- Advertisement -

तथापि सिडकोतील घरांच्या क्रमांकाबाबत (House numbers) निर्माण झालेला संभ्रम अद्यापही कायम आहे. सिडको प्रशासनाने वसाहत उभारताना मराठी महिन्यांची नावे देऊन घरांचे क्रमांक निश्चित केले आहेत. हे क्रमांक खूपच लांबलचक असल्याने नवख्या माणसाला ते लक्षात ठेवणे जड जाते. एवढेच नव्हे तर येथे येऊन एखादे घर शोधणे नवख्यांसाठी दिव्यच ठरते.

महापालिकेकडे या योजना हस्तांतरण झाल्या आहेत. त्यामुळे मनपाने सिडकोतील घरांचे क्रमांक बदलायला काहीच हरकत नाही. मात्र याकामी कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नसल्याने सिडकोवासियांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिडको प्रशासनाने नाशिक शहरात 6 गृहयोजना साकारल्या आहेत. या सहाही योजनांना चैत्र, वैशाख, आषाढ अशी मराठी महिन्यांची नावे देऊन तसे सेक्टर तयार केले आहेत. सिडकोच्या कागदोपत्री मराठी महिन्यांच्या नावांचे सेक्टर दिसतात.

तसेच घरांना क्रमांक देतांनासुद्धा मराठी महिन्यांच्या सुरुवातीचे अक्षर इंग्रजीत घेऊन त्यात सेक्टर क्रमांक, चाळ क्रमांक आणि घर क्रमांक याचा समावेश करण्यात आला आहे. सिडकोने अशा अनोख्या पद्धतीने घरांना क्रमांक दिले असले तरी लक्षात ठेवायला व शोधायला असे क्रमांक अतिशय कठीण आहेत. वर्षांनुवर्षे येथे राहणार्‍यांना या घर क्रमांकांची सवय झाली असली तरी या भागात प्रथमच येणार्‍या माणसाला दिलेल्या क्रमांकाचे घर शोधणे म्हणजे कठीण जाते.

पूर्वी सिडकोने प्रत्येक सेक्टरमधील घरांचे नकाशे ठिकठिकाणी लावले होते. मात्र आता हे फलक गायब झाले आहेत. सिडको प्रशासनाने अवघड घर क्रमांक देऊन लोकांची अडचण वाढवली आहे. मनपाचे तत्कालीन स्थायी समिती सभापती डॉ.सुभाष देवरे यांनी प्रत्येक घराला मनपाने क्रमांक द्यावेत, असा ठराव महासभेत केला होता.

या ठरावाला मंजुरी मिळून मनपाने प्रत्येक घरांवर नव्या क्रमांकाच्या प्लेटस् लावायला सुरुवातही केली होती. सर्व घरांवर क्रमांक टाकून झाल्यावर त्यानुसारच घर क्रमांक प्रचलित करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र ही योजना पुढे अर्ध्यावरच थांबली आणि रखडली आहे.

गोंधळात गोंधळ म्हणजे सिडकोने दिलेले क्रमांक पूर्वी प्रत्येक चाळीच्या किंवा इमारतीच्या दर्शनी भागावर रंगवले होते, पण ते क्रमांक आता गायब झाले आहेत. त्यामुळे पोस्टमन अथवा बाहेरगावाहून नव्याने येथे येणार्‍या लोकांना सिडकोत एखाद्या नातलगाचे वा मित्राचे घर शोधणे त्रासदायक ठरत आहे.

मनपाने केलेली नावांची योजना बंद पडल्यावर त्याबाबत एकाही नगरसेवकाने अथवा राजकीय नेत्याने त्याचा पाठपुरावा केलेला नाही. सिडकोच्या सर्वच योजना मनपाकडे हस्तांतरीत झाल्या आहेत.

मग सिडकोतील घरांना नवे क्रमांक देण्याची मनपाची तयारी का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवीन नाशकातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन याबाबत ठोस भूमिका घेतल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकेल.

सिंहस्थकाळात मनपाने अनेक ठिकाणी नव्याने दिशादर्शक फलक लावले आहेत. नवीन नाशकात मात्र तशा पद्धतीने सेक्टरनुसार फलक का लावले नाही, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

नव्याने खाजगी मिळकतींवर विकसित होणार्‍या कॉलनी भागात ज्या पद्धतीने नकाशे लावले जातात तसे नवीन नाशकात कोणते सेक्टर कोठे आहे याचे फलक लावण्याची आवश्यकता भासत आहे.

जुन्या नाशकातील घरांना वा वाड्यांना जसे क्रमांक दिले गेले आहेत तसे क्रमांक सिडकोतील घरांना द्यावेत, अशी मागणी होत आहे. मनपाने सिडको प्रशासनाच्या घरांच्या घरपट्टयांना जे क्रमांक दिले आहेत तेच क्रमांक घरांना दिल्यास ते सोयीचे ठरणार आहे. मात्र यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

पाठपुराव्याअभावी योजना बारगळली

सिडको प्रशासनाने घरांना दिलेले क्रमांक अतिशय किचकट आहेत. त्यावर उपाय म्हणून हे क्रमांक बदलण्याबाबत आणि प्रत्येक घराला परिवहन विभागाप्रमाणे (आरटीओ) क्रमांक देण्याचा ठराव मनपात करण्यात आला होता. त्यानुसार काही प्रमाणात काम सुरुही झाले होते. मात्र पाठपुरावा न झाल्याने नंतर ही योजना बारगळली. सिडकोचे सध्याचे घर क्रमांक फक्त सिडकोच्या कागदोपत्री व्यवहारासाठी ठेवावेत. मनपाने नवे क्रमांक देऊन ते व्यवहारात वापरले तर सोयीचे होईल.

– डॉ. सुभाष देवरे, माजी नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या