Friday, May 3, 2024
Homeनगरप्रेरणा पतसंस्थेने रोजगार निर्मितीला नवी दिशा दिली - माजी खा. तनपुरे

प्रेरणा पतसंस्थेने रोजगार निर्मितीला नवी दिशा दिली – माजी खा. तनपुरे

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

पाणी, पैसा, वीज व वेळेची उधळण न करता ती टाळली पाहिजे. शेतीवर अवलंबून राहणे आताच्या काळात शक्य नसून शेतकर्‍यांची मुलं शिकून सक्षम बनत असल्याने त्यांनी उद्योग-धंद्यात पुढे आले पाहिजे. गुहा सारख्या ग्रामीण भागातून प्रेरणा पतसंस्थेने हजारो शेतकरी व उद्योगधंदा करणार्‍यांना रोजगार निर्मिती करून देऊन एक नवी दिशा दिली असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.

- Advertisement -

गुहा येथे प्रेरणा पतसंस्थेच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. माजी खा. तनपुरे म्हणाले, निसर्गाच्या असमतोल वातावरणामुळे आता शेती करणे शक्य नाही. 11 हजार रुपये क्विंटल सोयाबीन 3 आठवड्यात 5 ते 6 हजार रुपये क्विंटलवर आला आहे. शेतकर्‍यांची मुलं चांगली व सक्षम आहेत. त्यांना फक्त मदतीचा हात मिळाला पाहिजे. त्यांनी उद्योगधंद्यात आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. पतसंस्था व सहकारी बँकांमध्ये ठेवी वाढत चालल्या आहेत. मात्र, कर्ज घ्यायला कुणी तयार नाही, असे चित्र आहे. हा काळ बिकट असून खोटी प्रतिष्ठा आणि पैशाची उधळपट्टी टाळावी, करोनाने जगाला बरेच काही शिकविले आहे.

काँग्रेसने 70 वर्षात काहीही केले नाही, असे चित्र देशात उभे केले जात आहे आणि दुसर्‍या बाजूला काँग्रेस काळात स्थापन झालेले अनेक प्रकल्प रेल्वे, बंदरे, पेट्रोल विभाग, टेलिफोन विभाग, यांचे मात्र खासगीकरण करण्याचा जणू सपाटा लावला जात असल्याची खदखद तनपुरे यांनी व्यक्त केली.

प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे म्हणाले, डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी नगर जिल्ह्यात सहकार चळवळीचे सुरू केले.ती सहकार चळवळ आज नगर जिल्ह्यात उत्तम कामगिरी करत आहे. राष्ट्रीयकृत बँक ज्या सुविधा देतात, त्या सर्व सुविधा येत्या काळात सहकारी पतसंस्था सभासद खातेदारांना देणार आहे. प्रेरणा संस्थेमध्ये सर्वसमावेशक खातेदार असून 235 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. 56 कोटी 50 लाख रुपयांच्या ठेवी असून सीडी रेशो 55 टक्के आहे. करोना काळात सभासदांना रूग्णालयाकरीता तातडीने कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे.

गेल्या 28 वर्षांपासून प्रेरणा पतसंस्थेने सभासद खातेदारांचा विश्वास संपादन केलेला आहे. माजी खा. प्रसाद तनपुरे यांचे व्हीजन प्रेरणादायी असून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याही कार्यकुशलतेचा गौरव यावेळी संस्थापक सुरेश वाबळे यांनी केला.

यावेळी माजी खा. तनपुरे यांच्या हस्ते सीए परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या अक्षय छाजेड, सिद्धार्थ भंडारी, वर्धमान सुराणा यांचा तर डॉ. अनंतकुमार शेकोकार यांचा पीएचडी मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

यावेळी कॉ.गंगाधर जाधव, नारायण जाधव, के.एम.पानसरे, नितीन गागरे, कुंडलिक खपके, सयराम जर्‍हाड, मुक्ताभाऊ खाटेकर, बापूराव रोकडे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र शिंदे, प्रेरणा मल्टिस्टेट व्हा. चेअरमन विष्णुपंत वर्पे, प्रेरणा सोसायटीचे व्हा. चेअरमन अशोक उर्‍हे, सोमनाथ शिंदे, सरपंच उषाताई चंद्रे व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद उपस्थित होते. आप्पासाहेब चंद्रे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या