Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedगांधी, अहिंसा आणि पोलीस

गांधी, अहिंसा आणि पोलीस

महात्मा गांधी, (Gandhi) अहिंसा (non-violence) आणि पोलीस (police) हा विषय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरू शकतो. भारतावर ब्रिटीशांचा सुमारे 150 वर्षे अंमलचा कालावधी आणि आज स्वातंत्र्याची 75 वर्षे (75 years of independence) पूर्ण होत असताना पोलिसांची कार्यपद्धती(Police procedures) आणि पोलीस बळाचा (police force) वापर हा देशातील सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना हिंसेकडे जाणारा आढळून येतो. जेव्हा समाजात कोणत्याही कारणाने हिंसात्मक क्रिया घडते, त्याला प्रतिबंध म्हणून पोलीस हातात अश्रू धुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे, दंडूके हाती घेतात. अपरिहार्य व टाळता न येणार्‍या स्थितीत पोलिसांना बंदुकींचा वापरही करावा लागतो. पोलिसांच्या नियमित व दैनंदिन कार्यपद्धतीचा हा भाग आहे. अशावेळी पोलिसांचा संबंध (relationship of the police) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना अभिप्रेत अहिंसेशी (Non-violently) कसा असू शकतो? हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे.

गांधीजींनी प्रामुख्याने दोन प्रवृत्तींशी लढा दिला. पहिला लढा भारताचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी होता तर दुसरा लढा भारतीयांच्या जगण्याच्या पद्धतीत सुराज्य निर्माण करण्यासाठी होता. या दोन्ही लढ्यांसाठी गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसा हे दोन मार्ग निग्रह-निर्धाराने अंगिकारले. भारतीयांना स्वीकारायला प्रवृत्त केले. जेव्हा प्रसंगानुसार अहिंसेच्या तत्वावर गांधीजी भाष्य करीत तेव्हा स्वराज्य-सुराज्य व्यवस्थापनात सैन्यदल आणि पोलीस दलाचा उपयोग अनिवार्य असल्याचे ते म्हणत. पोलीस व सैन्य व्यवस्था विरहीत भारतीय समाज असू शकत नाही असे मत गाधींजींनी अनेक प्रसंगात व्यक्त केले आहे.

एवढेच नव्हे तर स्वराज्याला सुराज्याकडे नेताना प्रत्येक भारतीय हा साध्या वेशातील पोलीसच असायला हवा असेही मत गांधीजींनी व्यक्त केले आहे. (1947, मार्च 27, प्रार्थना सभेत भाषण) गांधीजींना पोलीस यंत्रणेतील शिस्त, कायद्याचे पालन, सुरक्षा आणि सुव्यवस्था या गोष्टी सामान्य नागरीकांकडून अपेक्षित होत्या असा निष्कर्ष यातून काढता येतो.

- Advertisement -

गांधीजींच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडले की त्यांनी सातत्याने पोलीस, सैन्य यांच्या कार्यपद्धतीचा स्वीकार केला. त्याचे समर्थन सुद्धा केले. मात्र जेथे पोलीस वा सैन्य बळाचा गैरवापर झाला तेथे कठोर भूमिका मांडत अन्यायग्रस्तांनी अशा कार्यवाहीला कायदेशीर व सनदशीर मार्गाने विरोध दर्शवायला हवा असे आवाहनही गांधीजींनी केल्याचे दिसते. गांधी, अहिंसा आणि पोलीस या विषयावरील स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी काही ठळक संदर्भ समोर आणू या.

संदर्भांची पडताळणी आणि अन्वयार्थ

गांधीजींची अहिंसेची तत्त्वे आणि त्यानुसार आचरण यात पोलीस व सैन्यबळाची खरेच गरज आहे का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. एका कोरीयन विद्यार्थ्याने असाच प्रश्न गांधीजींना विचारला होता. तो विद्यार्थी म्हणाला, गांधीजी आपण अहिंसेचे तत्त्व स्वीकारत असताना पोलीस आणि सैन्यबळाला विरोध का करीत नाही? याच प्रश्नाच्या उत्तरात गांधीजींनी पोलीस व सैन्य बळाच्या आवश्यकतेवरील दृढ विश्वास दर्शवला आहे. गांधीजींनी उत्तर दिले, मला मान्य आहे, अहिंसेचा स्वीकार करताना पोलीस वा सैन्यबळाची पाठराखण करणे ही विसंगती आहे. मी देशात किंवा इतर राज्यात पोलीस वा सैन्य यांच्या शिवाय व्यवस्था सुरू करायचे आवाहन करू शकतो.

पण मला हा विश्वास नाही की आपण पोलीस विरहीत समाज निर्माण करू शकतो. त्यामुळे अहिंसेच्या पालनासाठी मर्यादा म्हणून पोलीस व्यवस्थेचा मी स्वीकार केला आहे.(1931, आक्टोबर 17, बॉम्बे क्रॉनिकल, महादेव देसाईकी हस्तलिखित डायरी) पोलीस आणि सैन्याची देशाला गरज आहे हे मत गांधीजींनी वारंवार जाहिरपणे मांडलेले दिसते. त्यांच्या एका वक्तव्यात उल्लेख आहे की, स्वराज्य प्राप्त झाल्यानंतर देशातील अंतर्गत शांती व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची आणि देशावर बाहेरील आक्रमणकर्त्यांना रोखण्यासाठी सैन्याची गरज आहे. या शिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही.

पोलिस व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करताना गांधीजींनी काही अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्यात. समाज स्वातंत्र्य म्हणजे गुन्हेगारीचे स्वातंत्र्य नव्हे. सुराज्यात पोलीस व सैन्यबळ कमी असायला हवे हे मी मानतो. माझ्या मनातील पोलीस व्यवस्था आताच्या (ब्रिटीश कालिन) कार्यपद्धतीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. पोलिसांचाही अहिंसेच्या तत्त्वावर विश्वास असायला हवा. पोलीसांची व्यवस्था समाज सेवकाची हवी.

त्यांनी समाजाचे मालक बनू नये. नागरीकांनी सहजपणे आपली गार्‍हाणी पोलिसांकडे मांडावित आणि पोलीसांनी आपापसातील सहकार्याच्या भावनेतून त्यातील अडथळे दूर करावेत. पोलीस शस्त्रसज्ज हवेत. पण त्याचा वापर करायची वेळ येऊ नये. स्वराज्यात पोलीस व्यवस्थेची पुनर्रचना गरजेची असून त्यांचे भय चोर व दरोडेखोरांना असायला हवे. (1937, आक्टोबर 23, हरिजन) गांधीजींनी पोलिसांचे कार्य आणि गुन्हेगारांमधील सुधारणा याचाही वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. गांधीजी म्हणत, स्वतंत्र भारतात गुन्हे घडतील पण ते करणारे कायम गुन्हेगार असणार नाहीत.

गुन्हेगारांना शिक्षा असणार नाही. त्यांच्या गुन्हे करण्याचा आजार बरा केला जाईल. अगदी खून करणा़र्‍याचा आजारही दूर केला जाईल. (1946, 5 मे, हरिजन) याच अनुषंगाने गांधीजींनी कारागृहाला रूग्णालय व गुन्हेगाराला रूग्ण म्हणत कारागृहातील अधिकारी व कर्मचा़र्‍यांनी रूग्णाला बरे करायचा म्हणजे गुन्हे प्रवृत्तीतून मुक्त करायचा प्रयत्न करावा असेही म्हटले आहे. (1947, नोव्हेंबर 2, हरिजन) भारतीय पोलिसांनी कसे वागायला हवे? या विषयी गांधीजींनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. लंडन पोलीस व भारतीय पोलीस याची तुलना करताना गांधीजी म्हणाले होते, मी लंडनला अनेकवेळा गेलो. तेथील जनता कायद्याची पालनकर्ती आणि समजदार आहे.

त्यामुळे तेथील पोलिसांना हाती बंदूक घ्यावी लागत नाही. तेथील जनता पोलिसांना हितचिंतक समजते म्हणून त्यांचे ऐकून काम करते. तेथे लाच देणे-घेणे चालत नाही. भारतातील पोलिसांनी लंडन पोलिसांची कार्यपद्धती स्वीकारावी. लाच घेऊ नये. जर त्यांचे पगारात भागत नसेल तर त्यांनी सरकारला पगार वाढवायला सांगावे.

लाच घेणे सोडावे. (1947, जून 1, प्रार्थना प्रवचन) गांधीजींनी पोलीस व्यवस्थेला नेहमी जनतेचे सेवक असे संबोधन दिले आहे. गांधीजी ब्रिटीश राज्य व्यवस्थेला सत्याग्रह करून विरोध दर्शवित असत. मात्र कायद्याचे पालन करीत शांततेच्या मार्गाने विरोध हे गांधीजींचे तत्त्व होते. त्याच अनुषंगाने गांधीजींनी ब्रिटीश सरकारकडून पोलीस व सैन्यबळाच्या वारंवार वापराला विरोध दर्शवला होता.

चंपारण्य येथे रौलेक्टला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी केलेल्या अन्यायाची घटना पाहून गांधीजी अस्वस्थ झाले. गांधीजी कायद्याचे पालन संदर्भात पोलिसांना सल्ला देत म्हणाले, सरकार हे जनतेचे सेवक आहे. पोलीस सरकारचे सेवक आहेत. म्हणजे पोलीसही जनतेचे सेवक आहेत. अशावेळी सरकारने जनतेवर अन्याय करणारा आदेश दिला तर तो आदेश बेकायदेशीर आहे.

जनतेवर अन्याय करणारा आहे. तो पाळू नका. सरकारचा आदेश म्हणजे ईश्वराचा आदेश हे समजू नका. सरकार लोकांची घरे लुटायला वा अब्रुला हात घालायला सांगत नाही. मग पोलीस जनतेवर अत्याचार कशाला करतात ? (1920, डिसेंबर 8, बेतिया येथील भाषण)

पोलिसांचे काम पोलिसांनी ध्यैर्याने व कौशल्याने करावे ही अपेक्षा दर्शवत गांधीजी म्हणाले होते, डर्बनमध्ये एका निरपराध माणसाच्या विरोधात जनक्षोभ वाढला. संतप्त लोक त्या व्यक्तीला ठार मारायला निघाले. तेव्हा तेथील पोलीस जमावात शिरले आणि त्यांनी त्या व्यक्तिला संतप्त जमावातून सुखरूप बाहेर काढले. तेव्हा तेथील अधिकार्‍यांनी सैन्याची मदत घेतली नाही.

गांधीजींच्या आयुष्यात पोलिसांच्या सहकार्याचे आणि पोलिसांमुळे लोकक्षोभाला सामोरे गेल्याचे प्रसंगही आले. मात्र अशाही स्थितीत गांधीजींनी पोलीस व्यवस्थेवरील विश्वास ढळू दिला नाही. गांधीजींनी 1917 मध्ये पहिल्यांदा चंपारण्यात भेट देऊन तेथील नीळ उत्पादक शेतकर्‍यांचे गार्‍हाणे ऐकले. तेथील नीळ ब्रिटीश यंत्रणा कवडीमोल भावात खरेदी करीत असे. तेव्हा समोरच्या पक्षाचे म्हणणे ऐकून घ्यायला ते तेथील कमिशनरकडे गेले. त्याने गांधीजींना धमकावत चंपारण्य सोडून जायला बजावले.

मात्र गांधीजी हत्तीवर बसून चंपारण्यात जेथे थांबले होते तेथे गेले. तेव्हा त्यांच्या सोबत एक पोलीस आला. त्याच्याकडे प्रवेशबंदीचा आदेश होता. गांधीजी मुक्कामी पोहचले आणि त्यांनी पहिल्यांदा प्रवेशबंदीचा आदेश मोडत असल्याचे त्या पोलिसाला नम्रतेने सांगितले. या प्रकरणी गांधीजींवर खटला दाखल झाला.

पण नंतर तो न्यायाधिशांनीच खारीज केला. या घटनेविषयी गांधीजींनी म्हटले आहे की, मी आदेशाचा अवमान करीत असे. अधिकाराच्या पदावर असलेल्या व्यक्तीशी मात्र संबंध चांगले ठेवत असे. त्यामुळे अधिकारी मला मदत करायाला लागले. (1942, जुलै 28, मेरिस फ्रैडमेनको पत्र, सेवाग्राम)

मुंबईतील मणीभवनमध्ये गांधीजींच्या मौनाचा सत्याग्रह सुरू असतानाचा असाच प्रसंग आहे. स्वराज्यासाठी असहकाराचे आंदोलन सुरू करीत गांधीजींनी मौन स्वीकारले. तेव्हा मुंबईचे पोलीस कमिश्नर त्यांना अटक करायला रात्री 3 वाजता आले. गांधीजींना झोपेतून उठवून अटक करीत असल्याचे ते म्हणाले. मात्र हा प्रसंग परस्पराप्रती आदर दाखवत घडला. कमिशनरने गांधीजींना अर्धातास वेळ दिला. ते तयार झाले.

कमिशनरने गांधीजींच्या खांद्यावर केवळ हात ठेवून प्रतिकात्मक अटकेची कारवाई केली. गांधीजी तेथून रवाना झाले. गांधीजींचे वय तेव्हा खूप होते. मात्र त्यांनी तब्बेतीचा कोणताही बहाणा केला नाही. (ट्रायबल वर्ल्ड आफ वारियर एल्विन)

गांधीजींना पोलिसांचा सामना सतत करावा लागत असे. त्यामुळे त्यांच्यासमोर नेहमी अनेक प्रश्न उद्भवत. गांधीजी अफ्रिकेचा पहिला दौरा करून आले. त्यांनी तेथील काळे-गोरे भेदावर लेखन करणारी पुस्तिका लिहिली. ती अफ्रिकेत पोहचली. तेथील गोर्‍यांना वाटले गांधी गोरे विरोधात आहेत. गांधीजी दुसर्‍यावेळी अफ्रिकेत जहाजाने पोहचले. तेव्हा तेथे बंदरात गांधी विरोधात घोषणा देत गोरे गोळा झालेले होते. तेव्हा जहाजाच्या कॅप्टनने सांगितले, तुम्ही आता उतरू नका. सायंकाळी उतरा.

तेव्हा लोक असणार नाहीत. तेथे श्री.लाटन होते. ते म्हणाले, मी माझ्या जबाबदारीवर गांधींना रूस्तम यांच्या घरी सोडतो. गांधीजी तेव्हा जहाजावरून खाली आले. कस्तुरबा गाडीने निघाल्या व गांधीजी पायीच निघाले. काही जण हल्ला करायला पुढे आले. त्यांनी गांधीजींना मारहाण केली. ते जखमी झाले. तेव्हा तेथे सुपरीटेंडण्ट अलेक्झांडर आले. त्यांनी पाहिले काही लोक गांधीजींना मारहाण करीत आहेत. अलेक्झांडर यांनी इतरांना दरडावले. त्यांनी स्वतःच्या छत्रीतून गांधी यांना नेले.

गांधी तेथून बाहेर पडून रुस्तमजी पारसींकडे गेले. तेथेही काही गोरे गोळा होऊन गांधींना मारण्यासाठी धमकावू लागले. अखेर पोलिसांच्या आग्रहाखातर भारतातील सैनिकासारखे वेषांतर करून गांधीजींना तेथून बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण प्रसंगात सुपरिटेंडन्ट यांनी गांधीजींना मैत्रीपूर्ण मदतच केलेली दिसते. (एसव्हीजी 39, पी 148/152)

सत्याग्रह वा आंदोलन करीत हिंसक होण्याची कृती गांधीजींना मान्य नव्हती. हिंसक जमावावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर गांधीजी त्या कारवाईचे समर्थन करीत. मुंबईत रोलेक्ट कायद्याला विरोध करताना जमाव हिंसक झाला. जमावाने दगडफेक केली. पोलिसांनी काही हिंसक आंदोलकांना अटक केली. त्यांना सोडविण्याच्या मागणीचे समर्थन गांधीजींनी केले नाही. गांधीजी म्हणाले, असे कृत्य करणार्‍यांना सोडवायचा प्रयत्न करणे हे धर्म आणि कर्तव्याच्या विरोधात आहे. आम्ही सत्याग्रही म्हणून अशी मागणी करू शकत नाही.( संपूर्ण गांधी वाड़मय 15, पी 218/219)

निष्कर्ष

महात्मा गांधी यांच्या चरित्रातील पोलीस व्यवस्थेशी संबंधित अनेक उदाहरणे आजच्या समाज आणि सरकारी व्यवस्थेसाठी निश्चित मार्गदर्शक आहेत. गांधीवाद हा केवळ भाषणासाठी, विवादासाठी न स्वीकारता तो आचरणात आणला तर समाजातील ताण-तणावाचे प्रसंग निश्चित कमी होतील. गांधीजींना अपेक्षित स्वराज्याची वाटचाल सुराज्याकडे होण्यासाठी अहिंसेचे तत्त्व, कृती व जबाबदारी समजून घ्यायला हवी. गांधी वाचून स्वीकारायला हवा. आचरणात आणायला हवा. पोलिसांना गांधी विचाराकडे नेत असताना व्यवस्थेत कार्यक्षम बदलाचा नवा प्रयत्न आहे. यासाठी जळगाव पोलीस अनोखा उपक्रम राबवते आहेत.

लेखनामागील उद्देश

गांधी, अहिंसा व पोलीस या लेखनामागे निश्चित असा उद्देश आहे. तो म्हणजे, गांधीजींचा पोलीस व्यवस्थेवर विश्वास होता. गांधीजींना पोलीस व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित होती. तशीच ती जनतेत आणि पुढा़र्‍यांमध्येही अपेक्षित होती. गांधीजींनी नेहमी आग्रह धरला की पोलिसांनी कायदेशीर पद्धतीने काम करावे.

वेळप्रसंगी सरकारचे (म्हणजे सरकारमध्ये बसलेल्या एखाद्या दुराग्रही व्यक्तीचे) आदेशही पोलिसांनी ऐकू नये, असे गांधीजी म्हणत. वेळप्रसंगी पोलिसांचे ऐकावे. त्यांना सहकार्य करावे हे गांधीजी कृतीतून दाखवून देत. सत्याग्रह आणि आंदोलन करताना एखादी मागणी करावी. ते करताना इतर कायद्यांचे पालन करावे असा आग्रह गांधीजींचा असे. गांधी चरित्रातील या ठळक बाबी पोलीस व्यवस्थेतील सर्व घटकांना योग्य पद्धतीने माहित होणे आवश्यक आहे.

गांधीजी जरी समाजासाठी पोलिस व्यवस्थेची पाठराखण करीत असले तरी सुराज्य निर्मितीसाठी जनसामान्यांत 4 गुण असावेत असे प्रतिपादन त्यांनी केले होते. मुंबईतील आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर गांधीजी म्हणाले होते, स्वराज्याचे सुराज्य निर्मितीसाठी कोणालाही स्व संरक्षणासाठी पोलिसांची गरज पडू नये. तशी फार कमी वेळ यावी. सुराज्यात कारागृहात कैदींची संख्या कमी असावी.

(1919, मे 12, शांतिपूर्ण हडताल-बंबईका आदर्श) सत्याग्रह करताना पोलिसांच्या सूचना व आज्ञांचे पालनकरावे अशी सूचना गांधीजी नेहमी करीत. (1919, एप्रिल 5, बॉम्बे क्रॉनीकल) पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी आहेत. जनतेला सतावण्यासाठी नाही असे गांधीजी म्हणत. यापुढे जाऊन गांधीजींनी असेही म्हटले आहे की, जेव्हा एखादा पोलीस दुसर्‍याला केवळ त्रास देण्यासाठी कृत्य करीत असेल तर ते त्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. अशावेळी नागरिकांचे कर्तव्य आहे की त्याने त्या पोलीसाला लूट करणारा समजून त्याला निश्चित विरोध करावा. (चंपारण्यात डायरशाही)

(या लेखातील संदर्भासाठी गांधीतिर्थ, जळगाव येथील तज्ज्ञ अभ्यासकांनी सहकार्य केले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या