Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedपालथ्या घड्यावर पाणी, अगदी गोदावरीचेसुद्धा!

पालथ्या घड्यावर पाणी, अगदी गोदावरीचेसुद्धा!

नवरात्र नुकतेच संपले. दसर्‍याने त्याची सांगता झाली. त्यानंतर नाशिकमधून खळाळणार्‍या गोदामाईचे पात्र निर्माल्याने काठोकाठ भरून गेले आहे. शक्तीपूजकांनी वर्षभराचे पुण्य आणि आशीर्वाद पदरी पाडून नवरात्रातील निर्माल्य मात्र गोदेच्या ओटीत टाकले आहे.

गोदापात्रात ठिकठिकाणी पाने, फुले, फूलमाळा आदी निर्माल्य तरंगत आहे. प्रसिद्धी माध्यमांतून त्याबाबतच्या सचित्र बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ‘आमचे काम संपले, आता निर्माल्य वाहून नेण्याचे काम तुझे’ असे जणू गोदावरीला फर्मावले गेले आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचा कंठशोष हल्ली सतत केला जातो, पण प्रदूषणमुक्तीचा दुर्मिळ योग गोदावरीच्या भाग्यात लवकर येईल, असे नदीपात्रातील तरंगते निर्माल्य आणि गोदाभक्तांची मानसिकता पाहता तूर्तास वाटत नाही. किंबहुना तसा योग येऊच नये, असेच प्रदूषणाला सढळ हातभार लावणार्‍याच्या मनात असावे.

- Advertisement -

निर्माल्य आणि टाकाऊ पदार्थांनी भरलेले ‘स्मार्ट सिटी’तील गोदापात्र पाहून नाशकात येणार्‍या पर्यटकांना काय वाटत असेल? गोदाप्रदूषणाची ओरड सदैव ऐकू येते. गोदावरीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रारही लोक करतात, पण तिला प्रदूषित करण्यात आपणही कळत-नकळत हातभार लावतो याचा मात्र सर्वांनाच विसर पडतो. नदी मानवी जीवन निर्मळ आणि समृद्ध करते, असे सांगून वर्षानुवर्षे नद्यांचे गोडवे गायले जातात, त्यांना ‘माता’ही म्हटले जाते, पण त्या केवळ ‘बाता’च ठरत आहेत.

गोदावरीचे पावित्र्य जपणे आणि स्वच्छता राखणे ही केवळ मनपाची जबाबदारी आहे, असा गैरसमज प्रदूषणकर्त्यांनी करून घेतला आहे का? गोदाकाठी येणार्‍या भक्तांची सरबराई करणार्या पुरोहितवर्गालाही गोदापात्र स्वच्छ ठेवण्याची गरज वाटू नये? घरातील केरकचरा, नकोशा वस्तू, निर्माल्य आदी टाकण्यासाठी तसेच भांडी-कुंडी, कपडे व वाहनसफाईसाठी गोदापात्र ही हक्काची जागा मानली गेली आहे का? नवरात्रानंतर एकट्या गोदापात्रातच निर्माल्य सोडले गेले, असे म्हणता येणार नाही.

राज्यच नव्हे तर देशभर साजर्या झालेल्या उत्सवानंतर ठिकठिकाणच्या नदीपात्रांची हीच अवस्था झाली असेल. गोदावरीपात्र त्याचे प्रातिनिधीक स्वरुप आहे. पूर्वी नद्या वर्षभर खळाळत. नदीपात्रात टाकलेल्या टाकाऊ वस्तू प्रवाहासोबत वाहून जात, पण आता चित्र बदलले आहे. नद्या बंदिस्त झाल्या आहेत. धरणे बांधून त्यांचे पाणी अडवले गेले आहे. पावसाळ्यात धरणे तुडुंब भरल्यानंतरच जादा पाणी सोडल्यावर नद्या धावू लागतात, अन्यथा थांबतात. त्यांची पात्रे डबकी बनतात किंवा कोरडी पडतात.

शिक्षण वाढले तसे स्वच्छतेचे महत्त्वही पूर्वीपेक्षा अधिक समजू लागले. शहरे वाढली. लोकसंख्या वाढतच आहे. मात्र घरातील स्वच्छतेचे महत्त्व उमजलेली शिक्षित माणसेसुद्धा सार्वजनिक ठिकाणांच्या व नदीनाल्यांच्या स्वच्छतेबाबत जागरूक का नसावीत? भारतीयांच्या मनोवृत्तीत कालानुरूप काही बदल होणे अत्यावश्यक आहे. नियम-कायदे असले तरी त्याला जुमानतो कोण? भारतीय समाज परंपराप्रिय आहे हेच त्याचे कारण असेल का? गणेशोत्सव काळात नाशिकसह अनेक महानगरांमध्ये तेथील मनपांकडून नदीप्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतली जाते.

लोकजागृती मोहिमा राबवल्या जातात. मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे उभारली जातात. लोकही त्याला प्रतिसाद देतात, पण तात्कालिक! असे उपक्रम सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांसाठी का राबवले जाऊ नयेत? गणेशोत्सवात स्वयंस्फूर्तीने पुढे येणार्‍या सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालये, तरुण मंडळींना नवरात्रातही निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवावा, असे का वाटू नये? गणेशोत्सवात दिसलेला उत्साह नवरात्रात का मावळावा? आपल्या हातून जलप्रदूषणाचे महापाप घडते याची जाणीव पुण्यसंचयासाठी धडपडणार्या श्रद्धाळूंना आणि उत्सवप्रिय लोकांना कधीतरी होईल का?

वर्षानुवर्षे लोकांची पापे धुवून त्यांना पवित्र करण्याचे काम करणार्या नद्यांची उपेक्षा आणखी किती काळ चालणार? अभ्यासकांच्या मते देशातील सर्वाधिक प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत. गोदावरीला ‘दक्षिणेची गंगा’ म्हटली जाते. उत्तरेतून वाहणार्या गंगेला प्रदूषणाने अवकळा आली आहे, मग ‘दक्षिणेची गंगा’ मानल्या जाणार्या गोदावरीचे पात्र तरी स्वच्छ का ठेवावे? असा कर्मदरिद्री विचार मनात डोकावणे किती उचित?

‘जागतिक नदी दिवस’ नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त पंतप्रधानांनी नद्यांचे महत्त्व ‘मन की बात’मधून देशवासियांना पटवून दिले, पण थोरामोठ्यांचे विचार अथवा उपदेश ऐकायचाच नाही, असेच लोकांनी ठरवले असेल तर त्याला ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असेच म्हणावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या