Sunday, May 5, 2024
Homeनाशिकश्रद्धेसह सामाजिक आरोग्य जपण्याचा संदेश

श्रद्धेसह सामाजिक आरोग्य जपण्याचा संदेश

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा असलेला सण नाताळसण Christmas Festival आज नाशिकरोड परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. जेलरोडचे संत अण्णा महामंदिर, मुक्तीधामसमोरील सेंट फिलीप चर्च, उपनगर येथील बाळ येशू मंदिरात भाविकांनी दर्शन घेत प्रार्थना केली.

- Advertisement -

संत अण्णा चर्चमध्ये नाशिक धर्मप्रांताचे बिशप लुर्डस डॅनिएल यांनी मार्गदर्शन केले. उपनगर नाका येथील बाळ येशू मंदिरात काल रात्री आठ, आज सकाळी साडेसहा, आठ, दहा आणि बारा वाजता मिसा झाली. फादर टोनी जुडशीक, फादर टेरी, फादर ऑगस्टीन डिमेलो, फादर बास्को, फादर ईरल फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक मिसाला शंभरच्या आतच भाविक उपस्थित होते.

मुक्तीधाम समोरील सेंट फिलीप चर्चमध्ये सकाळी मिसा झाला. सायंकाळी केकचा प्रसाद वाटण्यात आला. फादर देवेंद्र शिंदे, सुनील कांबळे यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. बाळ येशू मंदिर, नाशिकरोडच्या सेंट फिलीप चर्चमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. चर्च व शाळांमध्ये प्रभू येशूच्या जीवनावर आधारीत देखावे सादर करण्यात आले होते. घरांवर आकाश कंदिल, रोषणाई करण्यात आली होती. सांता क्लाजने मुलांना खेळणी व खाऊ वाटप केले. करोनाचे नियम पाळत ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्री नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळच्या पूर्वसंध्येला तसेच नाताळच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना व भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला.

संत अण्णा चर्चमध्ये बिशप लुडस डॅनियल यांनी सर्वांना शांती, प्रेमाचा संदेश दिला आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत आपल्यात ख्रिस्ताचा आत्मा वसती करत नाही, तोपर्यंत आपल्याला ख्रिस्तजयंतीचा खरा आनंद लाभू शकत नाही. ईश्वराचा शब्द झाला. माणसांमध्ये त्याने वास केला. परमेश्वरी प्रेमाने मानवी रुप धारण करुन मानवामध्ये वस्ती केली. ईश्वरी प्रेमाचे हेच रहस्य आपण ख्रिस्तजयंती दिनी साजरा करतो.

प्रभू येशूच्या जन्माव्दारे आजची ही नाताळाची रात्र उजळून निघत आहे. ख्रिस्तजयंतीच्या या मंगल क्षणी मानवासाठी नवजन्माची नवज्योती उगवली आहे. देवाचा मानवाशी व मानवाचा पुन्हा देवाशी संबंध जोडला गेला आहे. संत पौल म्हणतो, तारणाची ही देणगी मिळविण्यासाठी आम्ही काहीच केले नाही, उलट पाप करुन देवाच्या विरुद्धच वागलो पण देवपित्याने आमच्यावरील प्रेम व करुणेने आपला एकूलता एक पुत्र देऊन आपले तारण केले.

विद्युत रोषणाईने उजळले चर्च

देवळाली कॅम्प । वार्ताहर

प्रभू येशूचा जन्म हा प्रत्येकाच्या घरात व हृदयात होण्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणणे गरजेचे असल्याचा संदेश येथील सेन्ट पेट्रिक्स चर्चचे फादर पायस रॉड्रिक्स यांनी दिला. येथील धोंडीरोड परिसरात असणार्‍या सेंट पॅट्रिक्स चर्चमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रभू येशूचा जन्मोत्सव 50 टक्के ख्रिस्ती बांधवाच्या उपस्थितीत धार्मिक विधीने साजरा करण्यात आला. मुख्य प्रार्थना सभेच्यावेळी फादर रॉड्रिक्स बोलत होते. यावेळी त्याच्या समवेत फादर विल्सन परेरा उपस्थित होते. चर्चच्या प्रांगणात केना ऍंथोनी, सनी पिल्ले, विल्सन तंबी, पॅट्रिक्स स्वामी, लॉयड स्वामी, अल्विन स्वामी आदींनी गेल्या चार दिवस परिश्रम घेत बेथॅलेम शहर व प्रभू येशूच्या गव्हाणीत झालेला जन्माचा देखावा व ख्रिसमस ट्री साकार केला. चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर उजळून निघाला आहे.

येथील गवळीवाड्यात असलेल्या ख्राईस्ट चर्च येथे प्रिस्ट रेव्हरंड संदीप गंगोदक यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 ते दु. 12 वाजता पवित्र उपासना व पवित्र सहभागिता प्रीतिभोजन पार पडले. शुक्रवारी पवित्र बाप्तिस्मा विधी तर रात्री 9 वाजता मध्यरात्रीची उपासना व भक्ती करण्यात आली. पीटर वर्रा, आशिष गजार, आदर्श बोर्डे, ऐस्तर उफाडे, राजेश गोर्डे, सचिन पारकर, मनोज खोकर, स्मिता मिरपगार, मंदाबाई गजार आदींसह महिला मंडळ, तरुण संघ, शाब्बाथ शाळा, बायबल स्टडी ग्रुप व भजनी मंडळ आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या