Friday, May 3, 2024
Homeनगरराहात्यात इनामी जमिनीची परस्पर विक्री

राहात्यात इनामी जमिनीची परस्पर विक्री

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील सर्वे नंबर 118/5 आदिवासी इनामी जमीन शासन नियमाप्रमाणे विक्री करता येत नसतानाही जमिनीचे वारसांना कुठली कल्पना न देता जमिनीच्या गुंठ्याची नोटरी करून विक्री करण्यात आली असून परस्पर जमिनीची विक्री करणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होवून न्याय मिळावा, यासाठी आदिवासी महिलांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मैनाबाई मोहन पवार, सरस्वती भाऊसाहेब बर्डे, हिराबाई लहु मोरे या तीन उपोषणास बसलेल्या आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी बांधवांना मिळालेली इनामी जमीन वडील गोविंद किसन पवार यांना मिळालेली आहे. शासन नियमाप्रमाणे ही जमीन विकता येत नाही व खरेदी करता येत नाही असे असतानाही आमच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी सदर जमिनीचे गुंठे पाडून आम्हाला कुठलीही कल्पना न देता परस्पर नोटरी करून गुंठे विक्री केली आहे.

तसेच वडील गोविंद किसन पवार हे मयत झाले असल्याने सदर जमीला वारसाचे नावे नोंद होणे गरजेचे असतानाही तलाठी व तहसीलदार यांना अनेकदा अर्ज करूनही या जमिनीवर वारसाची नोंद झाली नाही. तसेच जमिनीची खातेफोड अद्याप झालेली नाही. आमच्या रक्तातील व्यक्तींनी आम्हाला कुठले प्रकाराची कल्पना न देता परस्पर गुंठे विकले. त्या ठिकाणी गुंठे खरेदी करणार्‍या व्यक्तींनी बांधकाम करण्यासाठी वाळू, खडी पोल आणून सदर जागेवर अतिक्रमण केले आहे.

या ठिकाणी असलेली जुनी वृक्ष वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या तोडण्यात आली आहे. सदर जमिनीवर बेकायदेशीररीत्या होणारे अतिक्रमण काढावे यासाठी मुख्याधिकारी यांना अर्ज देऊनही त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची आपण चौकशी करून संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे.

उपोषणास बसलेल्या आदिवासी महिला या अशिक्षित असल्याने त्याचा फायदा घेऊन त्यांच्या रक्तातील व्यक्तींनी त्यांना कुठलीही कल्पना न देता जमिनीची बेकायदेशीर रित्या नोटरी करून परस्पर विक्री केली आहे. जमिनीची परस्पर विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच जमिनीच्या वारसाची नोंद, खातेफोड करून संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाज त्यांच्या बरोबर आहे.

– सुकदेव गायकवाड, आदिवासी समाज नेते राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या