Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधगुळाची गोडी त्याला तिळाची जोडी

गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी

भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankranti) . विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी 14 जानेवारी या तारखेलाच येते.

मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.

- Advertisement -

मकर संक्रांती म्हणजे काय?

मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. आता हा सण दरवर्षी एकाच तारखेला कसा येतो असा प्रश्नही आपल्यातील अनेकांना निश्चितच पडला असेल. तर हा हिंदु संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो त्याच तारखेला येतो. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 जानेवारीला येतो. याआधी 2016मध्ये संक्रांत 15 जानेवारी रोजी होती.

भोगीचं महत्व

भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा!

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी ( Bhogi) हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी घर तसेच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात. सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकर्‍यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल व आसाम मध्ये भोगली बिहू ,पंजाब मध्ये लोहिरी , राजस्थान मध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.

या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे.

पूजेचा विधी

मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जातात. या सुगड्यांना दोर्‍याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते.

मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व

मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.

तीळ आणि गूळ यांचे काय महत्व आहे?

मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ (Sesame and jaggery) यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही वैत्रानिक दृष्टीकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या