Friday, May 3, 2024
Homeनगरबारागाव नांदूर व कुरणवाडी पाणीयोजनेचा वीजपुरवठा सुरळीत

बारागाव नांदूर व कुरणवाडी पाणीयोजनेचा वीजपुरवठा सुरळीत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

बारागाव नांदूर व 15 गावे तसेच कुरणवाडी व 19 गावे या दोन्ही पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. ही बाब राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित योजना चालकांनी थकित बिलापोटी काही रक्कम भरल्यानंतर योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना सुरू झाली. योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या तीन ते चार दिवसापासून दोन्हीही योजनातील संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. याप्रश्नी मंत्री तनपुरे यांना साकडे घालण्यात आले होते. ठराविक रक्कम भरल्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. बारागाव नांदूर व 15 गाव पाणीपुरवठ्याची 58 लाख रुपये थकबाकी होती. त्यापैकी सुमारे 4 लाख 55 हजार रुपयांचा भरणा करण्यात आला. पाणी योजनेला शासनाकडून 31 मार्च अखेर 50 लाख रुपयांचे येणे आहे. परंतु थकबाकी दिसत असल्याने पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला.

कुरणवाडी व 19 गावे या योजनेतील थकित वीज बिलापोटी 5 लाख रुपये महावितरण कंपनीला देण्यात आले. या योजनेचे अध्यक्ष सुयोग नालकर, उपाध्यक्ष हरिभाऊ हापसे, सदस्य अमोल भनगडे, किरण गव्हाणे यांनी मंत्री तनपुरे यांची मुंबई येथे भेट घेऊन कैफियत मांडली. बैठक झाल्यानंतर मार्ग काढण्यात आला. कुरणवाडी व 19 गाव पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करून योजनेतील दुरुस्तीला व सौर ऊर्जाप्रकल्प उभारणीला मंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून निधी मिळणार असल्याची माहिती अध्यक्ष सुयोग नालकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या