Friday, May 3, 2024
Homeनगरवाळू ठेकेदाराच्या वसुलीची काळजी प्रशासनाला!

वाळू ठेकेदाराच्या वसुलीची काळजी प्रशासनाला!

मातुलठाण |वार्ताहर| Matulthan

बाभुळगाव गंगा येथील गोदापात्रातून लिलावाच्या नियमांची पायमल्ली करत हजारो ब्रास वाळू उत्खनन झालेे असून आजही ते सुरूच आहे. या वाळूचा साठा केला जात आहे. महसूलचे काही अधिकारी या ठिकाणी दररोज भेटी देत असुन त्यांच्या डोळ्यादेखत वाळू लिलावाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याने स्थानिक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासकिय अधिकार्‍यांना वाळू ठेकेदाराच्या वसुलीची काळजी असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याची चर्चा परिसरात आहे.

- Advertisement -

बाभुळगाव गंगा येथील गोदावरी नदीपात्रातील लिलाव ठेकेदारांच्या चढाओढीमुळे 8 पटीने अधिक किमतीत गेल्याने नियम मोडून वाहतूक करण्याची खुली सुटच दिली कि काय अशी चर्चा नागरीक करत आहेत. तक्रारदार ग्रामस्थ यांनी वेळोवेळी प्रशासकिय अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीने नियम मोडून होत असलेल्या वाहतुकीबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याउलट उडवाउडवीची कारणे सांगून चालढकल करतात. त्यामुळे हे सर्व स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने सुरू आहे, असे दिसून येते.

दरम्यान, वाळू लिलाव प्रक्रीयेच्या नियमानुसार लिलाव झालेल्या घाटांमध्ये ठरवून दिलेल्या मापा एवढा वाळू उपसा हा ट्रक्टरद्वारे मजुरांच्या सहाय्याने लिलाव हद्दीच्या बाहेर टाकून तेथून वाहतूक करणे असा नियम असताना जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने ठेकेदारांनी वाळू उपसा केला आहे. ठरवून दिलेल्या मापाच्यावर वाळू हद्दीबाहेर आणून टाकली असून नदीपात्रात दोन मिटरपेक्षा अधिक खोली झाली आहे. त्यामुळे हा लिलाव त्वरीत रद्द करून नियमबाह्य वाळू उत्खनन करण्यास कुणाकडून परवानगी मिळाली आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव गंगा शिवारातील गट क्रं. 140 व 143, तसेच 147 आणी 148 मधील वाळू लिलाव चालु असुन लिलाव प्रक्रियेतील सर्वच नियमांची पायमल्ली केली जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय असून त्यात लाखो रुपये खर्च करून पिके शेवटच्या पाण्यावर आहे. नदी पात्रात मोजके पाणी शिल्लक आहे. त्यात संबंधित ठेकेदाराकडून पोकलेनच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे नदी काठचा शेतकरी आक्रमक झाला आहे. लिलाव प्रक्रिया बंद करण्यासाठी प्रयत्न करूनही बंद न झाल्यास नदीपात्रातच उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हद्दीच्या झेंड्यांना फुटले पाय

ज्या वेळेस लिलावाचा ताबा दिला जातो त्यावेळेस नंदीपात्रात हद्द ठरवून दिली जाते. औरंगाबाद अहमदनगर अशा दोन जिल्ह्यांची ही हद्द आहे. ठरवलेल्या हद्दीवर झेंडे लावले आहेत. पण आता हे झेंडेही चालू लागले आहेत. हद्द सोडून वाळू उपसा जोरात सुरू आहे. त्यामुळे झेंड्यांनीे सोडलेल्या हद्दीबाबत श्रीरामपूरचे महसूल प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या