Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांचा अभ्यासवर्ग

विधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांचा अभ्यासवर्ग

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे ( MLA Suhas Kande )यांचे मत बाद ठरल्याचा कटू अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने ( Shivsena ) आपल्या आमदारांचा अभ्यासवर्ग घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत शिवसेना आमदारांना विधान परिषद निवडणुकीतील (Legislative Council Election)मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणुकीत पसंती क्रमानुसार मतदान कसे करावे, याबाबत शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी परवा, सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभा निवडणुकीत आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत भाजपने ही मते बाद करण्याची मागणी केलीहोती.

मात्र, भारत निवडणूक आयोगाने शहानिशा करून सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवले. त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय राऊत यांना एक मत कमी पडले. राज्यसभेची नामुष्की विधान परिषद निवडणुकीत ओढवू नये यासाठी शिवसेना सावध झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत .या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेचे आमदार, शिवसेना समर्थक अपक्ष, छोटे पक्ष यांची बैठक पार पडली. या बैठकीची माहिती शिवसेना सचिव अनिल देसाई आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

शिवसेना आमदारांना मतदान प्रक्रियेविषयीची माहिती देण्यात आली. आमदारांना सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात आली असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. आघाडीचे नेते ठरवतील त्यानुसार आमदार मतदान करतील. या निवडणुकीत आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

काँग्रेसची मोर्चेबांधणी

विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 10 ते 12 मते आवश्यक आहेत. या मतांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसची भिस्त बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, एमआयएम, माकप आणि अपक्ष आमदारांवर आहे.

राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. राष्ट्रवादीला संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार या अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र, न्यायालयाने मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाला परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीनेही छोट्या पक्षांची मनधरणी सुरू केली आहे.

अजित पवारांमुळे भाजपचे आमदार आघाडीच्या गळाला?

विधान परिषद निवडणुकीत आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे काँग्रेस- राष्ट्रवादीचे असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले आमदार आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या