Friday, May 3, 2024
Homeनगरनाऊर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम होणार कधी ?

नाऊर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम होणार कधी ?

नाऊर |वार्ताहर| Naur

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जि. प. सदस्या मंगलताई पवार व जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे यांच्यासह ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातील 4 लक्ष अशा एकत्रित 16 लाख रुपयांच्या निधीतून श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन होऊन सुमारे 4 ते 5 महिने उलटून देखील संबंधित ठेकेदाराने इमारतीच्या (पायाचे खड्डे वगळता) कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे ही इमारत होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. या कामावरील संबंधित ठेकेदार बदलण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेकडून होत आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगलताई अशोक पवार यांच्या जिल्हा नियोजन मंडळ जनसुविधा अंतर्गत सुमारे 6 लक्ष रुपये तर जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या निधीतून 6 लाख तर ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून 4 लाख असे एकूण 16 लाख रुपये निधी असलेल्या येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे काम नेमके पूर्ण होणार कधी? असा सवाल ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून वेळेत काम होत नसेल तर त्याऐवजी प्रशासनाने दुसर्‍या ठेकेदाराची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

येथे पूर्वी असलेली अनेक वर्षांपूर्वीची इमारतीची अवस्था अतिशय खराब झाली होती. अनेक भिंतीना तडे गेले होते तर पत्र्यामधून पाणीसुद्धा गळत असल्याने जुनी इमारत धोकेदायक व बसण्यायोग्य नसल्याने प्रशासकिय पातळीवर निर्लेखन करण्यात येऊन तिचा लिलाव करण्यात आला होता. सदर लिलावानंतर जि. प. च्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला. मात्र पायासाठी खोदलेले खड्डे सोडता अद्याप कोणतेही काम पुढे होऊ शकले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार जनसुविधा केंद्र असलेल्या अगदी छोट्या इमारतीत सुरू आहे. ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा (कमी जागेअभावी) बसायला जागा नसते, अशी अवस्था आहे.

गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊनही तो वेळकाढूपणा करत आहे. ग्रामपंचायत माध्यमातून इमारतीचे काम लवकर पूर्ण करण्याची नोटीस देखील पाठवली आहे. पावसाळ्यात हाल होत असल्याचे 3 ते 4 वेळा फोनवरही सांगितले. मात्र संबंधित ठेकेदार मला ठराविक महिन्याची मुदत असून अशा नोटिसा पाठविल्यास आणखी कितीही महिने उशिरा काम करील, अशी भाषा करत आहे.

– सोन्याबापू शिंदे, सरपंच ग्रामपंचायत नाऊर

- Advertisment -

ताज्या बातम्या