Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याबनावट पत्राच्या आधारे सेस निधी पळविला

बनावट पत्राच्या आधारे सेस निधी पळविला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) सदस्यांमध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळातीळ अंतिम टप्प्यात निधीसाठी रस्सीखेच सुरु असताना सटाणा तालुक्यातील ( Satana Taluka )नामपूर गटाचे ( Nampur Gat) भाजपचे माजी सदस्य कान्हू गायकवाड यांचा ‘सेस’ निधी बनावट पत्राच्या आधारे पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गायकवाड यांनी मंगळवारी (दि.5) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली. यापूर्वीही गायकवाड यांना आपल्या गटासाठीच्या तब्बल दीड कोटीच्या निधीला मुकावे लागले आहे.

- Advertisement -

आपण दिलेले पत्र आणि बनावट पत्रावरील अंगठ्याची पडताळणी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या नावाने बनावट पत्र कुणी दिले याचा शोध आता प्रशासनाकडून सुरू असल्याचे समजते.

दि.21 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तत्पूर्वी, जास्तीत जास्त निधी मतदारसंघाला मिळावा यासाठी पदाधिकार्‍यांसह सदस्यांची चढाओढ सुरु होती. पंधराव्या वित्त आयोगाच्या नियोजनासह सदस्यांचा स्वनिधी अर्थात ‘सेस’ निधीचे पत्र सदस्यांकडून मागवण्यात आले होते. माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केलेल्या नियोजनात समान निधीचे वाटप झालेले नसल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने फेरबदल केला.

सर्वांना समान निधी वाटण्याचा निर्णय घेतल्यामुळे ज्या सदस्यांना कमी निधी मिळाला होता त्यांनाही 9 लाख 72 हजार रुपये मिळाले. तर ज्यांना जास्त निधी मिळाला होता त्यांचा निधी कमी केला. या सर्व घडामोडींमध्ये नामपूर गटातील अनुसूचित जमातीचे (एसटी) सदस्य कन्हू गायकवाड यांनी अंबासन गावातील तीन रस्त्यांची कामे सुचवली होती.

त्यांनी बांधकाम विभागाकडे पत्र दिल्यानंतर तुम्ही यापूर्वीच पत्र दिले असून त्यानुसार नियोजन केल्याची माहिती कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी त्यांना दिली. त्यावर गायकवाड यांनी हे पत्र माझे नसून, त्यावरील अंगठाही बनावट असल्याची तक्रार कार्यकारी अभियंता नारखेडे यांच्याकडे केली. परंतु, त्यांच्याकडून कुठलीही दाद मिळत नसल्याचे बघून अखेर गायकवाड यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांची मंगळवारी(दि.5) भेट घेवून आपली कैफियत मांडली.

आपल्या नावाने बनावट पत्र तयार करुन ते प्रशासनाला दिले. त्या पत्राच्या आधारे माझ्या विरोधकांच्या गावात ही कामे मंजूर केली आहेत. पहिल्या पत्रावर माझाच अंगठा असेल तर मी माझी तक्रार बिनशर्त मागे घेईल. पण नसेल तर माझ्या पत्रावरील कामे ग्राह्य धरावी, अशी मागणी सीईओंकडे केली आहे.

कन्हू गायकवाड, माजी सदस्य, नामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या