Friday, May 3, 2024
Homeनाशिकडाळींब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव

डाळींब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यात सुमारे साडेसहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबबागा (Pomegranate) असून प्रारंभी फायद्याची ठरणारी ही शेती आता खर्चिक बनली आहे.

- Advertisement -

निसर्गाचे दुष्टचक्र आणि रोगराईमुळे महागड्या औषधांची फवारणी, खते, मजुरी, शेणखत टाकून बागा जगवाव्या लागत आहेत. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) व पावसाची संततधार (heavy rain) सुरु असल्याने डाळिंबावर मर व तेल्या रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases) वाढला आहे. सर्व प्रकारच्या प्रयत्नानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी (farmers) हतबल झाले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (sharad pawar) यांनी राज्यात फलोत्पादन योजना (Horticulture Scheme) राबवून कष्टकरी शेतकर्‍यांना बागायती शेतीसाठी प्रोत्साहित केले होते. या संधीचा शेतकर्‍यांनी पुरेपूर फायदा घेत कमी पाण्यावर येणार्‍या डाळिंबबागा फुलविल्या. फलोत्पादन योजनेमुळे उजाड गावोगावची शिवारे लालचुटूक डाळिंबांनी डोलू लागली. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ताही लाभली. नंतरच्या काळात डाळिंबाच्या आरक्ता, मृदुला, शेंदर्‍या व भगवा या जाती विकसित झाल्या.

त्यांची हजारो एकर क्षेत्रात लागवड झाली. लागवडीचे क्षेत्र वाढले तसे रोगराईचे प्रमाणही वाढले. मात्र त्यावर प्रभावी नियंत्रण होऊ शकले नाही. दिवसेंदिवस उत्पादनखर्च वाढून उत्पन्न घटत गेले. आता तर उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कधीकाळी राज्यात डाळिंबाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसमादे पट्ट्यातील डाळिंबशेती (Pomegranate farming) आता तेल्या व मररोगामुळे पुर्णत: संकटात सापडली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत शेतकर्‍यांनी या वर्षीचा मृग बहार घेतला. काहींनी स्त्रीधन गहाण ठेवून कर्ज काढले. कुणी आप्तेष्टांकडून हात उसनवार पैसे घेतले. त्यातून बागेसाठी शेणखत, रासायनिक खते (Chemical fertilizers), छाटणी, पानगळ, आंतर मशागत, औषध फवारणी यावर हजारोंचा खर्च केला. काही बागांना फुलेच फुटली नाहीत, जिथे चांगली फुले आली होती, तिथे फुलगळ सुरू झाली आहे.

शिवाय, ज्या बागेत फुलांचे गाठीत रूपांतर झाले होते, त्या गाठीदेखील गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या संततधार पावसाने काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न देणार्‍या डाळिंबबागा संकटात सापडल्याने शेतकर्‍यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

अती पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कसमादे परिसरातील डाळींब बागांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक संकटात सापडले असून शासनाने कृषि विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. अनुदान स्वरूपात नुकसान भरपाई देवून डाळींब उत्पादकांना दिलासा द्यावा. शासनाने मदतीचा हात दिला तरच डाळींबाचे पिक तग धरू शकेल

– अरूण देवरे, डाळींब उत्पादक, दाभाडी

- Advertisment -

ताज्या बातम्या