Friday, May 3, 2024
Homeनगरखड्ड्यात डांबर दाखवा 10000 रुपये मिळवा!

खड्ड्यात डांबर दाखवा 10000 रुपये मिळवा!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील जुने कोर्ट-दिल्ली गेट या रस्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले असताना महापालिकेला सहा महिन्यानंतर खड्डे बुजविण्याची जाग आली आहे. परंतु हे खड्डे अत्यंत अयोग्यरित्या बुजविले आहेत. केवळ खडी आणि कच टाकून ते खड्डे बुजवण्यात आले आहे. त्याच्यामध्ये कुठेही डांबराचे प्रमाण दिसत नाही, असा आरोप मनसेच्या नितीन भुतारे यांनी केला आहे. बुजविलेल्या खड्ड्यांत डांबर आढळले तर 10 हजार रुपये बक्षीस देण्याची उपरोधिक घोषणा त्यांनी केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भुतारे यांनी म्हटले आहे की, जुने कोर्ट ते दिल्ली गेट या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठे-मोठे खड्डे पडले होते. तब्बल सहा महिन्यानंतर हे खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. मात्र, खड्डे बुजविताना केवळ खडी व कच यांचाच वापर करण्यात आला आहे. त्यात डांबराचा वापर केलेला दिसत नाही. अशा पद्धतीने खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून होत असताना त्याकडे आयुक्तांचे लक्ष नाही. अशा प्रकारे खड्डे बुजविण्याचे प्रकार सुरू असतील तर हा एक प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाखे आहे, असे भुतारे यांनी म्हटले आहे.

या खड्ड्यात टाकलेली खडी व कच पुन्हा रस्त्यावर येते. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढणार आहे. अयोग्यरित्या खड्डे बुजवून महापालिका नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. खड्डे बुजविलेल्या मटेरियलमध्ये जर कोणाला डांबराचे प्रमाण आढळले तर दहा हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी उपरोधिक घोषणा भुतारे यांनी केली आहे. वास्तविक रस्त्यांवरील खड्डे योग्यरित्या बुजविले गेले पाहिजे. मात्र, शहरात खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी सुध्दा नगर शहरात येऊन बुजविळेल्या खड्यांमध्ये डांबर दाखवावे असे आवाहन मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा केले आहे. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्तांना अनेकदा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग होत नाही. भ्रष्ट त्यामुळेच खड्ड्यातील डांबर दाखविण्याची अनोखी स्पर्धा भरविली असल्याचे भुतारे यांनी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या