Friday, May 3, 2024
Homeनगरसाध्या पध्दतीने लग्न केल्याने विवाहितेचा छळ

साध्या पध्दतीने लग्न केल्याने विवाहितेचा छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

साध्या पध्दतीने लग्न केल्याचा राग मनात धरून व माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याची घटना घडली आहे. भरोसा सेलमध्ये प्रकरण न मिटल्याने पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पती विनायक दिलीप सुर्यवंशी, सासू सरला दिलीप सुर्यवंशी, मोठा दीर पंकज दिलीप सूर्यवंशी, लहान दीर निखील दिलीप सुर्यवंशी (सर्व रा. विरेंद्र चाळ, जेल रोड, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा विवाह 30 जून, 2020 रोजी विनायक सोबत झाला होता. लग्नानंतर साधारण तीन महिने त्यांना सासरच्यांनी व्यवस्थित नांदविले. यानंतर पती फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याबाबत त्यांनी सासू व दीर यांना सांगितले असता त्यांनीही तुझ्या वडिलांनी साध्या पध्दतीने लग्न करून दिले म्हणून शारिरीक व मानसिक त्रास देत छळ केला.

तसेच पतीने नोकरीसाठी आई-वडिलांकडून 50 हजार रुपये घेऊन ये, म्हणून छळ केला. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी जानेवारी 2022 पासून माहेरी नगर येथे येऊन राहत आहे. त्यांनी भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तेथे फिर्यादी व त्यांच्या पतीमध्ये समझोता झाला नाही. समझोता न झाल्याने भरोसा सेलने पत्र दिले. या पत्रानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या