Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीरामपूर शहरात गावठी कट्ट्यासह दोघांना पकडले

श्रीरामपूर शहरात गावठी कट्ट्यासह दोघांना पकडले

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. न्यायालयाने दोघांनाही 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

गौरव संजय रहाटे (वय 22, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर) व रुपेश किरण जाधव (वय 18, रा. कामगार हॉस्पिटल, वॉर्ड नं. 6, श्रीरामपूर) अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह 1 लाख 1 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कारवाई होत असताना एकजण घातपाताच्या उद्देशाने, गावठी कट्टा व जिवंत काडतूस जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरिक्षक श्री. गवळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यानी शहर गुन्हे तपास पथकाचे सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे यांना कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानंतर बोरसे यांच्या पथकाने रात्री 10 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी चौकापासून काही अंतरावर सापळा लावला होता. यावेळी 2 इसम विनानंबर पांढर्‍या रंगाच्या अ‍ॅक्टीवावरून टिळकनगरहून श्रीरामपूरच्या दिशेने येत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडे गावठी कट्ट व जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्यांचे नाव विचारले असता त्यांनी गौरव संजय रहाटे (वय 22, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर) व रुपेश किरण जाधव (वय 18, रा. कामगार हॉस्पिटल, वॉर्ड नं. 6, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. या दोघांकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह 1 लाख 1 हजारांच्या मुद्देमाल रंगेहाथ जप्त केला.

रहाटे व जाधव या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी गावठी कट्टा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासाकरिता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली.

शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस शिपाई गौतम लगड, राहुल नरवडे, रमिझराजा अत्तार, गणेश गावडे, गौरव दुर्गुळे, मच्छिद्र कातखडे, भारत तमनर आदींनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या